मुंबई - लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा 'बिग बॉस सिझन -२' मधील प्रवास संपला आहे. बिग बॉसच्या घरात त्यांनी सहा आठवडे घालवले होते. या काळात चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. बिग बॉस चे हे घर म्हणजे भांडण तंटे आणि ताणतणाव असलेले घर आहे. या तणावामुळेच मी माझ्यातली क्षमता जास्त दाखवू शकली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 'सांस्कृतिक कट्टा' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सुरेखा पुणेकर यांनी बिग बॉसच्या घरातील आठवणी यावेळी जागवल्या. घरातून बाहेर पडताना सर्व कलाकारांनी मानाचा मुजरा केला, यातच मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली, असे त्या म्हणाल्या. तसेच, अभिजित, शिव आणि वैशाली हे शेवटपर्यंत चांगली खेळी खेळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे त्या म्हणाल्या की 'घरात राहताना मला माझी शेक्षणिक पार्श्वभूमी फार नसल्याची खंत वाटली. मात्र, माझे व्यावहारिक ज्ञान चांगले असल्याने मी एवढे दिवस घरात राहू शकले. एरवी प्रेक्षकांनी मला पूर्ण मेकअपमध्ये पाहिले आहे. पण, बिग बॉसच्या घरात मी मेकअपवीना प्रेक्षकांच्या समोर आले. त्यामुळे आता ते मला मेकअपशिवायही ओळखायला लागले आहेत. घरात ताणतणाव जरी असला, तरीही त्यातून बरंच काही शिकायला मिळालं. आता बाहेर आल्यावर पुन्हा लावणी कार्यक्रमांकडे वळणार असल्याचे त्या म्हणाल्या'.
लावणीमध्ये नवीन प्रयोग करणार असल्याचा मानस त्यांनी सांगितला. लोकांना आता पारंपरिक लावण्या फार आवडत नाही. त्यामुळे लोक संगीत, सिने संगीत तसेच वेस्टर्न संगीत, या माध्यमातून मी आता पुढे कार्यक्रम करणार आहे, असे त्यांनी सांगितले. यासोबतच राजकारणात जाण्याची इच्छा देखील त्यांनी बोलून दाखवली. लावणी जर अमेरिकेत जाऊ शकते, तर विधानसभेत का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चांगल्या पक्षाकडुन आगामी विधानसभा निवडणूका लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मोहोळ विधानसभा किंवा पुणे शहरातल्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूका लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आगामी काळात लावणी अकादमी देखील सुरू करण्याचा विचार असून पुण्यातच ही अकादमी सुरू करणार असेल, असे त्या म्हणाल्या.