दौंड - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे संपूर्ण जगभरात असंख्य चाहते आहेत. मात्र अनेकांना रजनीकांत यांचे मूळ गाव कोणाला माहित नाही. रजनीकांत यांच्या पूर्वजांचे मुळ गाव हे महाराष्ट्रातील आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार हे त्यांच्या पूर्वजांचे मूळ गाव आहे.
मावडी गाव :
मावडी कडेपठार हे गाव पुरंदर तालुक्यातील गाव आहे. जेजुरीपासून जवळच्या अंतरावर हे गाव असून या गावाची लोकसंख्या जेमतेम २५००च्या आसपास आहे. या गावात गायकवाड कुटुंबींयांची ३० ते ३५ घरे आहेत. येथील गायकवाड कुटुंबातील लोक रजनीकांत यांची भावकी असल्याचे सांगतात.
रजनीकांत यांच्या आजोबांचा प्रवास :
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वी रजनीकांत यांचे आजोबा मावडी कडेपठार या गावातून कामाच्या शोधात आपले घर आणि गाव सोडून कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील बागेवाडी येथे स्थायिक झाले होते. त्यानंतर तेथून बंगळूरला गेले असल्याची माहिती सांगण्यात येते.
घर बांधण्याच्या वेळी भावकीतील लोकांनी जाऊन भेट घेतली होती :
मावडी गावातील सचिन गायकवाड यांनी सांगितले की, जुन्या काळी गायकवाड कुटुंबीयांची एकत्र असलेल्या जागेत घर बांधण्याच्या वेळी गायकवाड कुटुंबातील लोकांनी कर्नाटक येथे जाऊन रजनीकांत यांच्या आजोबांची भेट घेतली होती, अशी माहिती गावातील वयस्क लोक अगोदर सांगत होते. त्यावेळी बांधलेले घरदेखील पडले असल्याचे सचिन गायकवाड यांनी सांगितले.
रजनीकांत यांना भेटण्याचा प्रयत्न :
मावडी गावातील लोकांनी अनेकदा रजनीकांत यांना भेटण्याचा प्रयत्न केला आहे. लोणावळा परीसरात रजनीकांत यांच शूटिंग सुरू असताना गावातील लोक त्यांना भेटण्यासाठी लोणावळा येथे गेले होते. तसेच दीपक श्रीरंग गायकवाड यांनी मुबंई येथे रजनीकांत यांची भेट घेतली होती आणि मावडी कडेपठार या मूळ गावी भेट देण्याची विनंती केली होती.
रजनीकांत यांची भावकी :
संपूर्ण जगभरात रजनीकांत या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या रजनी यांचे मूळ नाव शिवाजी गायकवाड आहे. मावडी कडेपठार येथे गायकवाड कुटुंबीयांची संख्या मोठी आहे. रजनीकांत यांनी सिनेसृष्टीत यश मिळवल्याचा मोठा अभिमान मावडी गावच्या ग्रामस्थांना आहे. आपल्या गावच्या सुपुत्राने मिळवलेल्या यशाचा अभिमान मावडी गावातील ग्रामस्थांना आहे. रजनीकांत यांनी मिळवलेल्या यशाच्या गोष्टी येथील लोक मोठ्या अभिमानाने सांगतात.
गावकऱ्यांची इच्छा :
रजनीकांत यांनी चित्रपट सृष्टीत मिळवलेल्या यशाचा येथील गावकऱ्यांना कायम अभिमान वाटत असतो. सुपरस्टार रजनीकांत यांनी मावडी कडेपठार या गावाला एकदा भेट द्यावी, अशी तेथील ग्रामस्थांची इच्छा आहे. आमच्या गावातील, कुटुंबातील एक व्यक्ती संपूर्ण जगभरात सुपरस्टार झाली आहे. ही बाब आमच्या साठी अभिमानाची आहे. रजनीकांत सर यांनी मिळवलेल्या यशाचा गावकऱ्यांना आनंद होतो. रजनीकांत सर यांनी एकदा आपल्या मूळ गावी भेट द्यावी. त्यांनी मावडी कडेपठार गावाला भेट दिली तर गावाचाही नावलौकिक होईल, असे मावडी कडेपठारच्या महिला सरपंच वैशाली खोमणे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वी महान क्रिकेटपटूचे निधन, भारताविरुद्ध केले होते पदार्पण