मुंबई - रंगभूमीवरील कलाकारांना अलिकडे मोबाईल धारकांचा खूप वाईट अनुभव येतोय. नाटक सुरू असतानाच मोबाईलची रिंग वाजते आणि हे प्रेक्षक महाशय त्या मोबाईलवर बिनधास्त बोलायला लागतात. आपल्या या वागण्याने रंगमंचावर काम करीत असलेल्या कलाकारांना डिस्टर्ब होतोय हे साधे गणित त्यांना कळत नाही.
असाच अनुभव अनेक कलाकारांनी यापूर्वी घेतलाय. काही दिवसापूर्वी नाशिकच्या कालिदास कलामंदिरात सुमीत राघवनचा 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकाचा प्रयोग ऐन रंगात आला असताना एका प्रेक्षकाच्या मोबाइलची रिंग वाजली आणि याच प्रयोगादरम्यान हे बराच वेळ सुरु असल्यामुळे संतप्त झालेल्या सुमीत राघवनने नाटकाचा प्रयोग अखेर थांबवला. असाच अनुभव चिन्मय मांडलेकरलादेखील आलाय आणि असाच अनुभव घेतलेला सुबोध भावेही वैतागलाय. त्याने तर नाटक सोडण्याचा विचार बोलून दाखवलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सध्या सुबोध भावेचे अश्रुंची झाली फुले हे नाटक सुरू आहे. या नाटकाच्या दरम्यान सतत फोन येत असल्यामुळे तो वैतागलाय. त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित नाटक सोडण्याचा विचार व्यक्त केलाय.
मराठी माणसाने मराठी नाटक जपले, वाढवले आणि मोठेदेखील केले. भारतात मराठी रंगभूमीचा दर्जा इतर राज्यांच्या तुलनेत खूप मोठा आहे. अलिकडे मनोरंजनाची अनेक माध्यमे कार्यरत असतानाही मराठी रंगभूमी टिकवण्यासाठी कलावंत प्रमाणिकपणे प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर नाटक सुरू असताना प्रेक्षकांच्या फोनमुळे होणारा व्यत्यय गंभीर समस्या बनली आहे. मराठी रंगभूमी टिकायची असेल तर प्रेक्षकांनीही गंभीरपणे नाटकाकडे पाहायला पाहिजे. अन्यथा कधीकाळी मराठी नाटक होत असे, असे म्हणण्याची वेळ आगामी काळात येऊ शकते.