मुंबई - पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या मुख्य भूमिका असलेला 'ती अँड ती' हा सिनेमा आज जागतिक महिला दिनी प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने गुरूवारी मुबंईमध्ये या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. यावेळी या सिनेमाच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलेब्रिटी आवर्जून उपस्थित होते.
एवढंच नाही तर यानिमित्ताने बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांनीही हजेरी लावली. सई लोकूर, स्मिता गोंदकर, मेघा धाडे या पुष्करच्या मैत्रिणी यावेळी उपस्थित होत्या. याशिवाय श्रेयस तळपदे, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ जाधव, पुष्कर श्रोत्री, स्वप्ना वाघमारे-जोशी, परी तेलंग, माधव देवचके आदि अनेक कलाकार उपस्थित होते.
चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी सर्व कलाकारांनी मनसोक्त धमाल केली आणि सिनेमा पाहण्याचा आनंद लुटला. आता प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.