मुंबई - जागतिक महिला सप्ताहाचे औचित्य साधून मुंबईतील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात महिला चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. ज्येष्ठ समीक्षक शांता गोखले, दिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रभात चित्र मंडळाच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
याशिवाय महिला सबलीकरण मोहिमेत अग्रणी राहिलेल्या स्त्री उवाच या मासिकाच्या वेबसाईटचंही उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना सोनालीने आज आम्ही जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत तिथपर्यंत येण्यासाठी अनेक जणींना हा प्रवास करावा लागला असून बरंच काही सोसाव लागलं असल्याचं म्हटलं. त्यामुळे त्या सगळ्याच जणींच्या दृष्टीने हा टप्पा फार महत्वाचा असल्याचं मत तिने व्यक्त केलं.
सुनील सुकथनकर यांनी कलेची माध्यमं आजही पुरुषसत्ताकच राहिल्याचं मत व्यक्त केलं. कोणत्याही स्टँड अप कॉमेडी शोमध्ये पुरुषांवर केलेले विनोद नसतात तर महिलेवर केलेले विनोद असतात. त्यामुळे जोपर्यंत हे चित्र बदलत नाही तोपर्यंत महिला पुढारलेल्या आहेत आणि समाजाने त्यांना पूर्णपणे स्वीकारले आहे, असं म्हणता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. ५ ते ७ मार्चदरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात अनेक उत्तम महिलाप्रधान सिनेमे पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळेल. ७ तारखेला जागतिक महिला दिनी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी दिग्दर्शित केलेल्या हमीद या सिनेमाचा खास खेळ या महोत्सवात पार पडून त्यानंतर महोत्सवाची सांगता होईल.