नांदेड - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी गायिका कविता कृष्णमूर्ती, गायक अभिजित कोसंबी आणि गायक सुदेश भोसले यांच्या रंगतदार गीतांची मेजवानी असणार आहे, अशी माहिती खा. हेमंत पाटील यांनी दिली.
मागील १३ वर्षांपासून सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे यावर्षीदेखील आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दरवर्षी यानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात. या वर्षीच्या आषाढी महोत्सवात १२ जुलै रोजी गायिका कविता कृष्णमूर्ती यांच्या गीतसंध्या गायनाचा कार्यक्रम आहे. १३ जुलै रोजी अभिजित कोसंबी यांच्या 'स्वर विहार' गायनाचा कार्यक्रम आहे. तर, १४ जुलै रोजी सुदेश भोसले यांच्या 'गीतों भरी शाम' गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
नांदेडकर रसिकांनी या भक्ती रसात चिंब होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना नांदेड दक्षिण तालुकाप्रमुख व्यंकोबा येडेदेखील उपस्थित होते.