साडेतीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली आषाढी वारी यंदा होऊ शकलेली नाही. यंदाची वारी चुकल्याची हुरहूर जशी वारकऱ्यांच्या मनात आहे, तशीच कलाकारांच्या मनातही आहे. विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी गायक महेश काळे, कवी- गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार नरेंद्र भिडे यांनी ‘विठ्ठला...'हे एक आगळे-वेगळे गाणे तयार केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या गाण्याचे बोल चक्क उर्दू भाषेत आहेत. गाणं उर्दुतच असून त्यात विठ्ठल भक्तीचा अनोखा रस आपल्याला अनुभवायला मिळत आहे. शास्त्रीय गायक महेश काळेंच्या स्वर्गीय स्वरांनी या गाण्याला एक नवी उंची मिळवून दिलेली आहे. या गाण्याच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टीपलेली वारीची छायाचित्रे वापरण्यात आलेली आहेत. डॉन स्टुडिओची निर्मिती असलेल्या या गाण्याचे ध्वनिमिश्रण तुषार पंडित यांनी केले असून हे गाणे लीड मीडियाचे विनोद सातव यांनी प्रेझेंट केले आहे.