मुंबई - दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि प्रभूदेवा यांचा हॉरर थ्रिलर असलेला 'खामोशी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा थरारक टीजर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आता समोर आलेल्या नविन माहितीनुसार, अभिनेत्री श्रृती हसन ही या चित्रपटात एक गाणं गाणार आहे.
श्रृती हसन ही अभिनयाव्यतीरिक्त गायनातही अग्रेसर आहे. तिच्या गायनाची सुरुवात १९९७ साली आलेल्या 'चाची-४२०' या चित्रपटापासूनच झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिचे वडील कमल हसन यांनी भूमिका साकारली होती. श्रृतीने बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटामध्ये गाणे गायले आहे. यापैकी 'तेवर' चित्रपटातील ' 'जोगनीया' हे गाणे सुपरहिट झाले होते. तिच्या 'सन्नाटा' या गाण्यालादेखील प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद दिला होता.
![Shruti Hasan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3402141_shruti.jpg)
'खामोशी' चित्रपटातील गाण्याविषयी श्रृतीने आपला अनुभव शेअर केला आहे. मी प्रभूदेवा यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. आता त्यांच्या चित्रपटासाठी मला गायनाची संधी मिळत असल्याने मी फार आनंदी आहे. तमन्ना ही देखील माझी चांगली मैत्रीण आहे', असे तिने एका माध्यमाशी बोलताना सांगितले. 'खामोशी' चित्रपटाच्या थीमवरच आधारित हे गाणे राहणार आहे.
![Khamoshi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3402141_khamoshi.jpg)
'खामोशी' चित्रपटाचे दिग्दर्शन चक्री टोलेटी हे करत आहेत. या चित्रपटात भूमिका चावला आणि संजय सुरी यांच्याही भूमिका आहेत. येत्या ३१ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.