मुंबई - चित्रपटाचं नाव हटके असेल तर ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते, त्याबद्दल उत्सुकता निर्माण करते. म्हणूनच निर्माते-दिग्दर्शक आपल्या चित्रपटासाठी काहीतरी वेगळ्या शीर्षकाच्या शोधात असतात. अश्याच एका हटके नावाच्या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. ‘गरम किटली' असे नाव असलेल्या या चित्रपटात आदित्य पैठणकर आणि श्रद्धा महाजन ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय यात विजय पाटकर, दयानंद शेट्टी, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, विशाखा सुभेदार, मनीषा पैठणकर, विराज गोडकर या कसलेल्या कलाकारांची दमदार फळी आहे.
आशयघन कथानकाला सर्जनशील दिग्दर्शनाची जोड देत नवनवीन प्रयोग करण्याची परंपरा लाभलेल्या मराठी सिनेसृष्टीत आणखी एका नवीन चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आही. 'गरम किटली' या आगामी चित्रपटाचा मुहूर्त अंधेरी येथे नुकताच संजय दत्त अभिनित ‘वास्तव’ चित्रपटाचे निर्माते दिपकभाऊ निकाळजे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला. याप्रसंगी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि सिनेसृष्टीतील काही मान्यवर मंडळी उपस्थितीत होती. 'गरम किटली' या लक्षवेधी शीर्षकामुळं मुहूर्तालाच हा चित्रपट कुतूहल जागृत करणारा ठरत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज पैठणकर करणार असून चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद ही त्यांचेच आहेत. मुहूर्तानंतर लगेचच मढ येथे 'गरम किटली'च्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे.
चित्रपटाचं 'गरम किटली' हे टायटल बरेच अर्थ सांगणारं आहे. चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. दिग्दर्शक राज पैठणकर म्हणाले की, “'गरम किटली' हा चित्रपट प्रेक्षकांचं परीपूर्ण मनोरंजन करणारा ठरेल. करमणुकीसोबतच एक विचारही हा चित्रपट सर्वदूर पोहोचवेल. यातील कथानक प्रत्येकाला रिलेट करणारं असून, यातील व्यक्तिरेखाही समाजात कुठेतरी दिसणाऱ्या वाटतील. या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, यासाठी संपूर्ण टिम खूप मेहनत घेत आहे.”
डिओपी अनिकेत के. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करत असून क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत योगेश महाजन. चित्रपटातील गीते राज यांची असून किरण-राज ही संगीतकार जोडी या गाण्यांना संगीत देणार आहे. 'गरम किटली'चे कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी कपिल चंदन अचूकपणे सांभाळत असून कलादिग्दर्शक आहेत देवदत्त राऊत आणि नंदू मोहरकर.
गणेश रॅाक एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'गरम किटली' या चित्रपटाची निर्मिती केली जात असून चैत्रसेन नाहक आणि राजेश हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
हेही वाचा - वरुण सूदपासून वेगळे झाल्याची दिव्या अग्रवालने केली घोषणा