मुंबई - सध्या भारतभर नागरिक सुधारणा कायद्याच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. याला बॉलिवूडच्या असंख्य कलावंतांनी पाठिंबादेखील दिलाय. खरंतर या मुद्यावर कलावंतांच्यामध्ये दोन गट तयार झालेत. कायद्याच्या बाजून बोलणारे आणि विरोधात बोलणारे अशी उभी फुट दिसून येते. अशातच मराठी कलाकार शशांक केतकरने फेसबुकवर पोस्ट लिहून कायद्याला समर्थन दिलंय.
शशांक केतकरने पोस्टमध्ये लिहिलेला मजकूर पुढील प्रमाणे आहे.
"आपण भारताचे नागरिक आहोत हे जर prove करावं लागणार असेल तर प्रॉब्लेम काय आहे!???
नवीन कायदा हा भारतात अवैध पद्धतीने राहणाऱ्या लोकांसाठी आहे, कुठल्याही वैध भारतीय नागरिकासाठी नाही.
एकीकडे भारताची लोकसंख्या खूप आहे, राहायला जागा नाही, म्हणून आपण रडायचं आणि दुसरीकडे इतकी वर्ष चालत आलेली घुसखोरी थांबवण्यासाठी काही नियम केले तर त्याला विरोध करायचा! हा प्रकार थांबला पाहिजे.
दिल्लीत घडलेला प्रकार खेदजनकच आहे, कुठलीही हिंसा वाईटच पण चुकीच्या माहितीचा प्रसार करून लोकांना घाबरवणे हे त्याहून वाईट. हे प्रकार ताबडतोब थांबवले पाहिजेत. आपण भारतीयांनीच आपापसात भांडून काहीही हाती लागणार नाहिये. आसाम मध्ये झालेला प्रकार सुद्धा अत्यंत खेदजनक आणि त्रासदायक आहे पण याची सुरुवात म्यानमार पासून होते. म्यानमार मधले अनेक रेफ्युजी बांगलादेशमध्ये गेले. बांगलादेशला ते डोईजड झाले. बांगलादेश मधले लाखो नागरिक भारतात आले आणि आता ते आपल्याला डोईजड होत आहेत. तीच गत पाकिस्तान आणि आफ्रिकेतून येणाऱ्यांची सुद्धा. घुसखोरी करून देशात शिरला असाल आणि मूळ भारतीयांची जमीन हिसकावून घेत असाल, तर तुम्हाला बाहेर काढलंच जाईल."
शशांकने ही पोस्ट लिहिल्यानंतर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. अर्थात प्रतिक्रियाही दोन्ही प्रकारच्या आहेत. काहीजणांनी त्याला ट्रोल करत त्याच्या वैचारिक भूमिकेवर आक्षेप घेतलाय. तर काहीजणांनी त्याच्या भूमिकेचे समर्थन केलंय. इतर भाषेतील अभिनेत्यांमध्ये उघड राजकीय भूमिका घेण्याची परंपरा आहे. त्या तुलनेत मराठी कलावंत अपवादानेच राजकीय भूमिका घेत असतात. आता शशांकने घेतलेल्या भूमिकेचा परिणाम आगामी काळात काय होणार याची प्रतीक्षा करावी लागेल.