अभिनेता ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘शर्माजी नमकीन'. त्यांनी या चित्रपटाचे बरेच शूटिंग पूर्ण केले होते परंतु गेल्या वर्षी काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि हा चित्रपट मधेच अडकला. निर्मात्यांनी उर्वरित भागाचे चित्रीकरण अभिनेते परेश रावल यांना घेऊन पूर्ण केले. यावर्षी ऋषी कपूर यांच्या वाढदिवशी म्हणजेच ४ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस होता. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची वेळापत्रकं कोलमडली आणि त्यात ‘शर्माजी नमकीन’ चाही समावेश आहे.
म्हणूनच ऋषी कपूर यांच्या वाढदिवशी निर्मात्यांनी ‘शर्माजी नमकीन’ च्या फर्स्ट लूक चे अनावरण केले. त्यांनी दोन पोस्टर्स रिलीज केली असून एकात ऋषी कपूर दिसत आहेत तर दुसऱ्यात परेश रावल. महत्वाचं म्हणजे दोघांचाही ‘गेट-अप’ सारखाच आहे त्यामुळे ते गोड वाटतेय. एक्सेल एंटरटेनमेंट चा प्रवक्ता म्हणाला की, ‘ऋषि कपूर यांनी शानदार चित्रपट आणि अद्वितीय काम करीत सर्वांसाठीच एक अमूल्य ठेवा ठेवला आहे. त्यांच्याविषयीचे प्रेम, सन्मान आणि आठवणींच्या रूपात त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी भेट म्हणून त्यांच्या अंतिम चित्रपटाच्या 'फर्स्ट लूक’ चे अनावरण करत आहोत. श्री परेश रावल यांचे खूप खूप आभार, ज्यांनी ऋषि-जी यांच्याद्वारे साकारण्यात येणाऱ्या व्यक्तिरेखेला चित्रित करण्यासाठी संवेदनशील पावले उचलत या चित्रपटाला पूर्ण केले. एक्सेल एंटरटेनमेंट आणि मैकगफिन पिक्चर्सद्वारे निर्मित, नवोदित हितेश भाटियाद्वारे दिग्दर्शित, हा चित्रपट एका प्रेमळ ६० वर्षीय व्यक्तिची कथा मनोरंजकपणे मांडतो.”
एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे प्रस्तुत आणि मैकगफिन पिक्चर्स प्रोडक्शनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक हितेश भाटिया यांनी केले आहे. त्याचा दिग्दर्शनाचा हा पहिला प्रयत्न आहे. चित्रपट रितेश सिधवानी, फरहान अख्तर, हनी त्रेहान, अभिषेक चौबे यांच्याद्वारे निर्मित असून कासिम जगमगिया यांची सह-निर्मिती आहे. ‘शर्माजी नमकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
हेही वाचा - सायरा बानू यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पुन्हा अँजिओग्राफीसाठी दाखल करणार