मुंबई - 'दबंग स्टार' सलमान खानचा 'भारत' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रिमिअरदरम्यान सलमान खानच्या लाखो चाहत्यांनी त्याची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, सलमानच्या बॉडीगार्डने एका लहान मुलाला दूर हटवल्याने सलमानने त्याच्या कानशिलात लगावली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.
सलमान खानच्या भोवती चाहत्यांच्या गराड्यामुळे त्याचे सुरक्षारक्षक गर्दीला दूर हटवू लागले. त्यांच्यामधून सलमान खान चालत येत होता. दरम्यान त्याच्या एका सुरक्षारक्षकाने एका लहान मुलाला दूर ढकलले, याचा सलमानला राग आला आणि त्याने त्याच्या कानशिलात लगावली. त्याच्या या कृतीमुळे काही नेटकरी नाराज झाले. तर, काहींनी चाहत्यासाठी सलमानने बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली म्हणून त्याची प्रशंसा केली आहे.
बुधवारी (५ जून) ईदच्या मुहूर्तावर सलमानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटबाहेरही चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी सलमानने त्याच्या आईवडिलांसह चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.