मुंबई - बॉलिवूडमध्ये अॅक्शन चित्रपटांसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीची ओळख आहे. त्याने आत्तापर्यंत बरेच सुपरहीट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याच्या अॅक्शनपटात हिरोसोबत चित्रपटाचा विलनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. आता 'सूर्यवंशी' चित्रपटासाठीही त्याने एक दमदार विलन शोधला आहे.
'अक्स', 'गुलाल' आणि 'मॉम' यांसारख्या चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारणारा अभिमन्यू सिंग हा 'सूर्यवंशी' चित्रपटातही खलनायकाच्या रूपात दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या 'सिंबा' चित्रपटात सोनू सुद याने खलनायकाची भूमिका साकारली होती. आता 'सूर्यवंशी' चित्रपटात अभिमन्यू सूर्यवंशीसोबत भिडताना दिसणार आहे.
![Abhimanyu Singh as villan for sooryavanshi film](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3266110_abhi.jpg)
याबद्दल अभिमन्यूने एका माध्यमाशी बोलताना सांगितले, की 'रोहितने माझी एका तमिळ अॅक्शन चित्रपटातील भूमिका पाहून 'सूर्यवंशी'साठी निवड केली आहे. त्या चित्रपटातही माझी नकारात्मक भूमिका होती. मात्र, त्यामध्ये मी हिरोचीदेखील भूमिका साकारली होती.
![Abhimanyu Singh as villan for sooryavanshi film](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3266110_abh2.jpg)
'सूर्यवंशी' चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना तो म्हणाला, की 'या चित्रपटातील माझी भूमिका अत्यंत क्रुर आहे. पोलिसांविरोधात एकप्रकारची लढाईच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे'.
अक्षय कुमार या चित्रपटात एटीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, कॅटरिना कैफ ही देखील या चित्रपटात झळकणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.