मुंबई - रविना टंडन लहान असताना ऋषी कपूर सुपरस्टार होते. रोमँटीक सिनेमे करून चाहत्यांच्या मनावर राज्य करत होते. मात्र, काही वर्षांनी रविना टंडन ऋषी कपूरसोबत चित्रपटात झळकली. रविनाने ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच रविनाने तिचे वडील चित्रपट निर्माते रवी टंडन यांचे ऋषी कपूर यांच्यासोबतच्या आठवणीदेखील चाहत्यांशी शेअर केल्या. ऋषी कपूर यांचे ३० एप्रिलला मुंबईत निधन झाले.
मी ऋषी कपूर यांच्यासोबत खूप चित्रपटांमध्ये काम केलेलं नाही. मात्र माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत अनेक चित्रपट केले. मी अगदी लहान असल्यापासून त्यांना बघत आले. मी ऋषीजींच्या डोळ्यांसमोर मोठी झाली, असे रविना सांगते. ऋषीजींचं जाणं ही माझ्या वडिलांसाठी कधीही न भरून निघणारी पोकळी आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या अगदी जवळचा एक मित्र गमावलायं असे रविनाने सांगितले. पुढे ऋषीजींच्या आठवणी सांगताना रविना सांगते की मला अजूनही आठवतयं की माझे वडील, पंचम अंकल म्हणजेच आरडी बर्मन, रमेश बेहेल अंकल आणि ऋषीजी सोबत मिळून मजा करायचे. त्यांच्या जाण्याने माझ्या वडिलांना खूप मोठा धक्का बसलाय.
रवी टंडन यांनी 'खेल खेल में' आणि 'जूठा कहीं का' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. रविनाने १९९५ मध्ये आलेल्या 'साजन की बाहों में' या चित्रपटात ऋषी कपूरसोबत काम केले होते.
रविनाने ऋषीजींसोबतची तिची शेवटची भेट रिमा जैन यांच्या घरी गणेशोत्सवादरम्यान झाली होती, हेदेखील सांगितले. मी रिमाजींच्या घरी गणपती पुजेला गेले होते. मी तेथून निघणार तेवढ्यात ऋषीजी येत आहेत, असे रिमाजींनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी मी तिथेच थांबले, कारण ते न्युयॉर्कहून परतल्यापासून मी त्यांना भेटले नव्हते. ते आल्यानंतर आम्ही गणपती आरती केली आणि खूप गप्पा मारल्या. हीच माझी त्यांच्यासोबतची शेवटची आठवण असल्याचे रविनाने सांगितले.
पुढे बोलताना रविना म्हणते, आय लव्ह यू चिंटू अंकल...असं वाटतयं की माझ्या आयुष्याचा अविभाज्य व्यक्ती, माझ्या बालपणीच्या आठवणी सगळं अचानक, एका क्षणात हिरावून गेलयं. चिंटू अंकल तुम्ही असे अचानक कसे निघून जाऊ शकता. त्यांचे मनमुराद हसणे, त्यांच्यासोबत काम करताना सेटवर रागावणे, या सर्व आठवणी रविनाने सांगितल्या.