चेन्नई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित 'दरबार' हा चित्रपट आज (९ जानेवारी) प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. प्रदर्शनापूर्वी 'दरबार'ची स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. यावेळी रजनीकांत यांची पत्नी लता आणि दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी हजेरी लावली होती.
'दरबार' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसेच अनेकांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा महोत्सवही साजरा केला.
बऱ्याच चाहत्यांनी रजनीकांत यांचा फोटो असलेले टी-शर्ट देखील घातले होते. तर, या चित्रपटाचा चांगला व्यवसाय व्हावा, यासाठी चाहत्यांनी मदुराईच्या मंदिरात प्रार्थना केली.
हेही वाचा -'दरबार' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी मुंबईत 'रजनी उत्सव'!
रजनीकांतचा हा १६७ वा चित्रपट आहे. या चित्रपटात ते पोलिसाच्या भूमिकेत झळकले आहेत. ए.आर. मुरुगोडास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये अभिनेत्री नयनताराने त्यांच्यासोबत भूमिका साकारली आहे.
रजनीकांत यांची अफाट अशी लोकप्रियता पाहता तमिळनाडू सरकारने काही स्पेशल शो दाखण्यासाठी देखील परवानगी दिली आहे. ९ ते १४ जानेवारीपर्यंत चार दिवस 'दरबार' चित्रपटाचे स्पेशल शो दाखवण्यात येणार आहेत.
हेही वाचा -रजनीकांत यांना साकारायची 'ही' भूमिका, 'दरबार' ट्रेलर लॉन्च सोहळ्यादरम्यान व्यक्त केली इच्छा