पणजी - महानायक अमिताभ बच्चन आणि थलैवा रजनीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्णमहोत्सवी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे रंगारंग सोहळ्यात थाटात उद्घाटन करण्यात आले. रजनीकांत यांना 'आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली' तर बच्चन यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
तावगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. अमिताभ बच्चन यांच्यासहस्ते दीपप्रज्वलनाने इफ्फीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी रजनीकांत यांना आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली पुरस्काराने गौरविण्यात आले. तर फ्रेंच अभिनेत्री इसाबेल हुपेर्ट यांना मंत्री जावडेकर यांच्याहस्ते ' जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अमिताभ बच्चन माझी प्रेरणा : रजनीकांत
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन आपली प्रेरणा असल्याचे सांगून हा पुरस्कार निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि प्रेक्षकांना समर्पित केला. तर अमिताभ बच्चन यांनी रजनीकांत आपल्या घरातील एक सदस्य आहेत. आम्ही दोघे एकमेकांना सल्ले देतो. मात्र, त्यांची अंमलबजावणी करत नाही. निर्माते, दिग्दर्शक, लेखक, गीत आणि संगीतकार यांच्यामुळे आज येथे उभा आहे. प्रेक्षकांचे ऋण कधीच फेडू शकत नाही. त्यांच्या ऋणात राहणे मला पसंत आहे, असे सांगितले.
यावर्षी ' रशिया' वर कंट्री फोकस आहे.
दरम्यान, म्हादई वादावरून गोव्यात केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याविरोधात असलेली नाराजी ते भाषणाला उभे राहिले असता प्रेक्षकांतून ' दिवचे ना रे दिलचे ना, आमची म्हादई दिवचे ना' अशा घोषणा दिल्या जात होत्या. या घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत प्रेक्षागृहाबाहेर नेले.
यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले, भारतीय चित्रपटात जीवन बदलण्याची ताकद आहे. त्यामुळे जगभरातील प्रेक्षक आता याचा प्रेक्षक होत आहे. ही भारताची सुप्त शक्ती आहे. जगभरातील चित्रपट निर्मित्यांनी भारतात येऊन चित्रिकरण करावे, यासाठी केंद्र सरकार लवकरच एक खिडकी योजना सुरू करणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तीला चित्रपट पाहता यावा, यासाठी निर्मात्यांनी तशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन केले.
शंकर महादेवन यांनी सांगितिक सादरीकरणाला अमिताभ बच्चन यांच्यासह उपस्थित सर्वांनी उभे राहून दाद दिली. त्यांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त ' वैष्णव जन तो तेणे कहीये जो' या भजनाचे जगभारातील विविध भाषांत सादरीकरण केले. त्यांना कँरोलीन मिनेझीस यांनी साथ केली. जाझ संगितावर त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.