चेन्नई - सुपरस्टार रजनीकांत यांनी 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'च्या शूटींगच्यावेळी अपघात झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. बंदीपूर या वाघांसाठी राखीव अभयारण्यात रजनीकांत पडल्यामुळे त्यांना जखम झाली असल्याची चर्चा होती.
शूटींगबद्दल बोलताना रजनीकांत म्हणाले, "बंदीपूर राष्ट्रीय उद्यानात 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' शोचे डिस्कवरी चॅनलसाठी माझे शूटिंग संपल्यानंतर मी (घरी) आलो आहे. यावेळी मला अपघात झाल्याच्या बातम्या फिरत आहेत. ते सत्य नाही. आम्ही शूटींग करीत असलेले ठिकाण काटेरी होते त्यामुळे याचा मला थोडा त्रास झाला, एवढेच आहे.''
कर्नाटकमधील शूटिंग संपल्यानंतर रजनीकांत चेन्नईला आपल्या घरी परतले आहेत. त्यांना अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. शिवाय बंदीपूर अभयारण्यातील जंगल अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला होता. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र स्वतः रजनीकांत यांनीच खुलासा केल्यामुळे यावर पडदा पडला आहे.