मुंबई - अक्षय कुमारने आपण कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याला राष्ट्रीय पुरस्कार कसा देण्यात आला असा सवाल उचलला गेला आहे. मात्र दिग्दर्शक राहुल ढोलकियांनी हा आरोप बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे. परदेशी नागरिक असलेल्या व्यक्तीस राष्ट्रीय पुरस्कार दिला जाऊ शकतो, असे मत ढोलकियांनी मांडलंय.
आज अनेक सोशल मीडियावरुन अक्षय कुमारच्या बाबतीत हा प्रश्न युजर्सनी उपस्थित केला आहे. यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते संकलक आणि लेखक अपूर्व असराणी यांनीही अक्षयला धारेवर धरले आहे.
यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, "होय, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कॅनडियन नागरिक असलेल्या व्यक्तीला भारताचा राष्ट्रीय पुरस्कार द्यावा का ? २०१६ मध्ये अक्षय कुमारला बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला होता, मात्र आम्हाला हा पुरस्कार 'अलिगड'साठी मनोज बाजपेयीला मिळेल असे वाटले होते? जर ज्यूरी आणि मंत्रालयाने कुमारच्या बाबतीत या त्रूटीकडे लक्ष दिले नसेल तर त्यासाठी पुनरविचार करु शकतात का ?"
तथापि, डायरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टीव्हलचा नियम असा आहे की, 'परदेशी फिल्म प्रोफेशनल्स आणि टेक्नीसियन यांचाही पुरस्कारांसाठी विचार होऊ शकतो.' राष्ट्रीय पुरस्कारासाठी ज्यूरी असलेल्या राहुल ढोलकिया यांनी पुढे होत आपल्या ट्विटरवर वरील खुलासा केला आहे.
'रुस्तम' या चित्रपटासाठी २०१६ मध्ये अक्षय कुमारला बेस्ट अॅक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतल्यापासून अक्षय कुमारच्या नागरिकत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. देशभक्तीची भाषा बोलणारा अक्षय स्वतःच भारताचा नागरिक नाही यावरुन त्याला ट्रोल करण्यात आले होते. यावर अक्षयने आपला सवीस्तर खुलासा करीत आपली बाजू मांडली होती.