मुंबई - 'झी युवा' वर 'साजणा' ही मालिका नव्याने सुरू झाली आहे. हळूहळू ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडू लागली आहे. या मालिकेतील 'रमा' ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बिरारी हीदेखील या मालिकेद्वारे घराघरात पोहोचली आहे. पूजाची ही पहिलीच मालिका आहे. मात्र, मालिकेचा एक भाग चित्रीत करत असताना पूजाच्या पायाला दुखापत झाली. तरीही शूटिंगमध्ये खंड पडू न देता तिने शूटिंग सुरू ठेवले.
या मालिकेत पूजा एका छोट्याशा गावात राहणारी, घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे पुरेसे शिक्षण घेऊ न शकलेली, तरीही स्वाभिमानी, अशा तरुणीची भूमिका साकारत आहे. तिची स्वप्ने मोठी आहेत. ही 'रमा' प्रेक्षकांच्या आवडीची ठरू लागली आहे.
'चिंगी' आणि 'रमा' या बहिणी नाशिकला मामाच्या गावी गेलेल्या असतात. त्यावेळी जत्रेत घडणाऱ्या एका अपघाताचा प्रसंग चित्रित करत असताना ही घटना घडली. जत्रेत उधळलेला घोडा चिंगीच्या अंगावर धावून जातो आणि प्रताप चिंगीला त्या घोड्यापासून वाचवतो, असा तो प्रसंग होता. मात्र, या चित्रीकरणाच्यावेळी घोडा खरंच उधळला आणि सेटवर खरोखरच एक अपघात घडला.