नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मिरला पुन्हा गतवैभव प्राप्त होऊन इथले निसर्ग सौंदर्य सर्वदूर पसरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. जम्मू - काश्मिर आणि लदाखमध्ये फिल्म इंडस्ट्रीने शूटींग करावे असे आवाहनही मोदी यांनी केले. राष्ट्राला उद्देशून दिलेल्या भाषणात त्यांनी हा उल्लेख केला.
असा एक काळ होता की काश्मिरच्या सुंदर लोकेशन्सवर शूटींग केल्या शिवाय बॉलिवूड चित्रपट पूर्ण होत नसे. असंख्य द्वंद्व गीते आणि नृत्ये इथे शूट झाली आहेत, असेही मोदी म्हणाले.
एकेकाळी बॉलिवूड निर्मात्यांचे काश्मिर हे सर्वात आवडते ठिकाण होते. त्यावेळी बहुतेक सर्व सिनेमांचे शूटींग तिथे होत असे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्राला उद्देशून भाषण करीत होते. जम्मू आणि काश्मिरच्या विकासाबद्दल आपली काय धोरणे असतील याबद्दल ते बोलत होते.
बॉलिवूड चित्रपटांसह दक्षिणेतील तामिळ, तेलुगु फिल्म इंडस्ट्रीनेही जम्मू काश्मिरमध्ये शूटींग करावे असे आवाहनही मोदी यांनी केले. यामुळे इथल्या रोजगाराला चालना मिळेल असेही ते म्हणाले.
जम्मू, काश्मिर आणि लदाखमध्ये शूटींग सुरू होणे हा परिस्थिती सामान्य होण्यासाठी एकमेव मार्ग बनू शकतो, असे सांगत त्यांनी स्थानिक लोकांचे प्रश्न हळूहळू सुटतील असा विश्वासही व्यक्त केला.