मुंबई - बॉलिवूड कलाकारांना सोशल मीडियावर अनेक ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. यापासून दूर राहण्यासाठी अनेक कलाकार सोशल मीडियाचा वापर करणंच टाळतात. यातीलच एक म्हणजेच करिना, मात्र असे असतानाही ट्रोलर्सच्या तावडीतून मात्र ती सुटली नाही.
अरबाज खान लवकरच पिंच हा वेब शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये करिनाने देखील हजेरी लावली होती. यावेळी कलाकार सोशल मीडिया आणि ट्रोलर्स याबद्दल शोमध्ये बोलत होते. यावेळी करिनाच्या एका फोटोवर आलेली ट्रोलरची कमेंट वाचून दाखवण्यात आली.
ही कमेंट अशी होती की, आता तू आंटी आहेस, तरूण मुलींप्रमाणे वागणं सोडून दे. ही कमेंट ऐकून सुरूवातीला करिना हसली. मात्र, काही वेळातच तिने याबद्दल आपलं मत व्यक्त केलं. लोकांना वाटतं की, कलाकारांना काही भावना नाहीत. कलाकारांच्या भावनांबद्दल ते काहीही विचार करत नाहीत आणि आपल्याला हे सर्व सहन करावं लागतं, असं म्हणत करिनाने याबद्दल खंत व्यक्त केली. या शोमध्ये करिनाशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी, सोनाक्षी सिन्हा आणि कपिल शर्मासारख्या कलाकारांनीही हजेरी लावली.