पुणे - नाईटलाईफविषयी विचारले असता रिंकू राजगुरू म्हणाली, नाईटलाईफ आणि ते काय असतं, असं सांगत तिने आपल्याला याविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान तिच्या या उत्तराने सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला. इतकी मोठी अभिनेत्री असून इतके दिवस मुंबईत राहून अजून नाईटलाईफविषयी माहिती नाही, असे भाव उपस्थितांच्या चेहऱ्यावर होते.
पुलण्यातील पत्रकार भवन येथे आज रिंकू राजगुरू ही आपला आगामी चित्रपट 'मेकअप' च्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी तिच्यासोबत सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेता चिन्मय उपस्थित होते. सैराट चित्रपटानंतर प्रकाशझोतात आलेली रिंकू संपूर्ण महाराष्ट्रात 'आर्ची' नावाने प्रसिध्द आहे. तिच्या या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. आगामी 'मेकअप' सिनेमाच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा चर्चेत आली.
दरम्यान पुण्यात या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या रिंकू राजगुरूला मुंबईत सुरू झालेल्या नाईटलाईफबद्दल विचारले असता तिने "नाईटलाईफ म्हणजे काय हेच मला माहित नाही, त्यामुळे मी यावर मत व्यक्त करू शकत नाही" अशी प्रतिक्रिया दिली.
तिच्या या उत्तराने या पत्रकार परिषदेला उपस्थित असणाऱ्यांना आश्चर्य वाटले. कारण रिंकू ही प्रसिध्द अभिनेत्री असून ती चित्रीकरणासाठी मुंबईत राहते. त्यामुळे मुंबईत राहूनही नाईटलाईफ म्हणजे काय हेच माहीत नसणे हा आश्चर्याचा धक्का होता. रिंकू ही महाराष्ट्रातील अकलुज या गावातून पुढे आली आहे.