मुंबई - 'बधाई हो' चित्रपटात आयुष्मान खुरानाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता यांचा आज वाढदिवस आहे. गेल्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील नीना गुप्ता यांच्या अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला. मात्र, एकेकाळी त्यांनी घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक वळणं आली. या वळणावर त्या न डगमगता पुढे चालत राहिल्या. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...
नीना गुप्ता यांच्या अभिनयाची सुरुवात 'खानदान' या टीव्ही मालिकेद्वारे सुरू झाली. यानंतर त्यांनी नजदिकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग आणि दिल से दिया वचन, अशा अनेक चित्रपटात त्या झळकल्या. पण, त्यांनी ८० च्या दशकात घेतलेल्या एका निर्णयामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, जगाच्या टीकेला सामोरे न जाता त्या त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या.
हा निर्णय होता वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत लग्न न करता त्यांच्या मुलीला जन्म देण्याचा. होय, नीना यांनी रिचर्डसोबत लग्न न करता कुमारी माता बनण्याचा निर्णय घेतला होता. एका सामन्यादरम्यान रिचर्ड आणि नीना यांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांनाही एकमेकांवर प्रेम जडले. मात्र, रिचर्ड हे विवाहीत होते. तरीही नीना यांनी त्यांचे नाते सुरू ठेवले. रिचर्ड यांनी त्यांच्या पत्नीपासून वेगळे व्हायचे नव्हते. पण, ते नीना गुप्ता यांच्या प्रेमात वेडे झाले होते.
कुमारी माता बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली होती. सिनेसृष्टीतही त्यांना टाळले जाऊ लागले. स्वत: त्यांनीदेखील एका मुलाखतीत सांगितले होते, की 'माझ्या बंडखोरीने माझे करिअर उद्धस्त केले होते'. मात्र, त्या त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या. आता त्याची मुलगी मसाबा ही बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणून ओळखली जाते. तर, नीना गुप्ता यादेखील आता सिनेसृष्टीत कार्यरत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
त्यांच्या 'बधाई हो' चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. सोशल मीडियावरही त्या अॅक्टिव्ह असतात.