मुंबई - बॉलिवूडवर ६०-७० च्या दशकात आपल्या अभिनयाला वेगळ्या उंचीवर पोहोचवणाऱ्या नर्गिस यांचा आज वाढदिवसा आहे. १ जून १९२९ साली त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या चित्रपट करिअरसोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्यदेखील खूप चर्चेत राहिले. त्यांची आणि राज कपूर यांची प्रेमकथा, त्यांचे ब्रेकअप त्यानंतर सुनील दत्त यांच्याशी लग्न, या सर्व गोष्टी त्यांच्या आयुष्यात अनामिक, अशा वळणावर घडल्या होत्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...
नर्गिस यांनी १९३५ साली 'तलाश-ए-हक' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांच्या 'मदर इंडिया' या चित्रपटाने त्याकाळी बरेचसे विक्रम रचले होते. या चित्रपटात त्यांनी तरुण वयात वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती. अशाप्रकारची भूमिका साकारणाऱ्या त्या पहिल्याच अभिनेत्री होत्या. या चित्रपटाला १९५८ मध्ये ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. पुढे चार दशकांपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांवर अधिराज्य गाजवले.
राज कपूर यांच्यासोबतही त्यांनी बऱ्याच भूमिका साकारल्या. पुढे त्यांच्या नात्याच्याही बऱ्याच चर्चा झाल्या. राज कपूर विवाहीत असूनही नर्गिस यांच्या प्रेमात पडल्या होते. त्यांचे नाते ९ वर्षे सुरू राहिले. राज कपूर हे नर्गिस यांच्यासोबत लग्न करू शकत नव्हेत. ते त्यांच्या वडिलांसमोरही जाऊ शकत नव्हते. त्यामुळे नर्गिस यांनीच त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. असे म्हटले जाते, की राज कपूर यांच्यापासून वेगळे झाल्यावर त्यांनी आत्महत्येचाही विचार केला होता.
पुढे त्यांच्या आयुष्यात सुनील दत्त यांची एन्ट्री झाली. 'मदर इंडिया' चित्रपटादरम्यान सेटवर खरोखर आग लागल्यानंतर सुनील यांनी आपल्या जीवाची बाजी लावून नर्गिस यांचा जीव वाचवला होता. ते स्वत: मात्र, गंभीर जखमी झाले होते. यादरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना नर्गिस यांनी त्यांची खूप काळजी घेतली. पुढे त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. त्यानंतर मार्च १९५८ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.
नर्गिस पुढे आपल्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त झाल्या. १९८० साली त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचाही कारभार सांभाळला. त्यानंतर त्यांना कॅन्सरचे निदान झाले. संजय दत्तच्या पहिला चित्रपट 'रॉकी'च्या प्रदर्शनापूर्वीच त्यांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते.