मुंबई - दिग्दर्शक नागराज मंजुळेंचं नाव चर्चेत आलं ते फँड्री चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर. सामान्य चेहऱ्यांना पडद्यावर झळकण्याची संधी देत नागराजने याआधी अनेकांना करोडपती बनवलं. अशीच संधी नागराज आता पुन्हा एकदा सामान्य मराठमोळ्या लोकांना देणार आहे. मात्र, यावेळी ही संधी कोणत्याही चित्रपटातून नाही तर एका शोमधून मिळणार आहे.
कोन बनेगा करोडपती या शोची घराघरात लोकप्रियता आहे ती महानायक अमिताभ बच्चन यांच्यामुळे. काही वर्षांपासून हाच प्रयोग मराठीतदेखील सुरू झाला आहे. मराठीतील कोण होणार मराठी करोडपती या शोच्या पहिल्या भागाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर यांनी केलं तर दुसऱ्या भागाचं स्वप्नील जोशीनं यानंतर आता तिसऱ्या भागाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी दिग्दर्शक नागराज मंजुळेकडे आहे.
नागराज मंजुळे येत्या सीझनचे सूत्रसंचालन करणार आहे. विशेष म्हणजे कोण होणार करोडपतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एक कलाकार नव्हे तर दिग्दर्शक याचे सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे, नागराजच्या चाहत्यांसाठी हा भाग अधिक खास ठरणार हे नक्की.