मुंबई - मल्ल्याळम अभिनेता मोहनलाल, तमिळ अभिनेता धनुष आणि तेलुगू कलाकार नानी यांच्या हस्ते ‘पेंग्विन’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. पेंग्विन हा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री किर्ती सुरेश यांचा आगामी थ्रिलर सिनेमा आहे. हा सिनेमा तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोबतच मल्ल्याळम भाषेतही डब केला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमागृहे बंद असल्याने हा चित्रपट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाच्या टीमला मोहनलाल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर, धनुषने ट्विट केलं आहे, की एका आईचा असाधारण प्रवास सुरु होत आहे. पेग्विंगनचा ट्रेलर प्रदर्शित करताना आनंद झाला. सिनेमाच्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. नानी यांनीही ट्विट करत टीमला शुभेच्छा दिल्या.
पेंग्विन एक क्राईम थ्रिलर सिनेमा आहे. यात किर्तीनं एका गर्भवती आईची भूमिका साकारली आहे. आपल्या भूतकाळाचे रहस्य उलगडण्यासाठी आणि तिच्या जवळच्या माणसांना वाचवण्यासाठी ती अनेक धोकादायक परिस्थितींचा आणि शारिरीक समस्यांचा सामना करते. पेंग्विन मी आतापर्यंत काम केलेल्या सिनेमांतील एक अतिशय रोमांचक आणि मनोरंजक प्रकल्प असल्याचं किर्तीनं म्हटलं आहे.
एक आईचे म्हणजेच माझे पात्र सौम्य आणि काळजी घेणारे आहे. सोबतच दृढनिश्चयदेखील आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास किर्तीनं व्यक्त केला. ईश्वर कार्तिक यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाची निर्मिती कार्तिक सुब्बराज यांनी केली आहे.