मुंबई - छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील काही दृश्यांना मनसेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मालिकेतील एका भागात मालवणी संस्कृतीची विडंबना केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याबद्दल योग्य तो बदल करून माफी मागण्यात यावी, अन्यथा 'मनसे' गप्प बसणार नाही, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिला आहे.
धीरज परब यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुकतीच मालिकेच्या सेटवर धडक दिली. कुडाळ तालुक्यातील आकेरी येथे या मालिकेचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. यावेळी निर्माते राजू सावंत यांची भेट घेण्यात आली. मनसेने मालिकेतील एका दृश्यावर निर्मात्यांकडे आपला आक्षेप नोंदवला आहे. 'रात्रीस खेळ चाले' ही मालवणी भाषेवर आधारित मालिका चांगलीच गाजत आहे. याआधी देखील या मालिकेत कोकणची चुकीची परंपरा दाखवण्यावरून आक्षेप घेण्यात आले होते. मालिकेच्या निर्मात्यांनी यापूर्वीही भावना दुखावल्या गेल्याबद्दल जाहीर माफी मागितली होती.
मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या इशारा आंदोलनावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे उपजिल्हाध्यक्ष पास्कॉल रॉड्रिंक्स, बाबल गावडे, गणेश वाईरकर, महिला तालुकाध्यक्षा सुप्रिया मेहता, कुडाळ उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे, जगन्नाथ गावडे, सहसचिव सचिन सरफदार, विभाग अध्यक्ष चेतन राऊळ, सुंदर गावडे, विनायक गावडे आदी उपस्थित होते.