मुंबई - 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सिझनची विजेती मेघा धाडेच्या घरी दरवर्षी ५ दिवस गणपती बाप्पाचं आगमन होतं असतं. यंदाही तिने गणरायाची स्थापना केली आहे. यावेळी मात्र, तिच्या घरी मुलतानी मातीच्या बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. बिग बॉस फेम शिवानी सुर्वेचा मित्र अभिजित याने या गणपतीची मूर्ती बनवली आहे. त्यावर फक्त हळद आणि कुंकू याच रंगाचा वापर करून बाप्पाला सजवण्यात आलं आहे.
मागच्या वर्षी मेघाने ट्री गणेशाची स्थापना केली होती. मात्र, यावेळी ती गणपतीरुपी झाडाला पाणी घालून त्याची वाढ करणार आहे. कारण, मुलतानी मातीचा गणपती हा फक्त ५ मिनीटात पाण्यात विरघळून जातो. हेच पाणी ती झाडांसाठी वापरणार आहे.
यंदा गणरायाच्या आगमनापूर्वीच बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा ग्रॅन्ड फिनाले पार पडला. त्यामुळं फिनालेसाठी हजर राहता आलं नाही, असे मेघानं यावेळी सांगितलं. ती पहिल्या सिझनची विजेती असली तरीही दुसऱ्या सीझनमधील स्पर्धकांशी देखील तिची मैत्री जमली आहे. दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे आणि त्याची मैत्रीण वीणा जगताप यांनी यावर्षी तिच्याघरी बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली.
याशिवाय अभिनेत्री हिना पांचाळ हीसुद्धा मेघाकडे आवर्जून दर्शनासाठी आली होती. शर्मिष्ठा राऊत, पुष्कर जोग, सई लोकूर, माधव देवचक्के, शिवानी सुर्वे, नेहा शितोळे, किशोरी शहाणे वीज, हिंदी बिग बॉसमधील जसलीन मुथारू यांना देखील तिने खास दर्शनासाठी आमंत्रण दिल आहे.
मेघाचा स्वयंपाकातही चांगलाच हातखंडा आहे. त्यामुळे गणपती बाप्पासाठी ती खास खान्देशी पद्धतीचे तळलेले कणकेचे मोदक तयार करत असते. त्यामुळे एकूणच कुटुंबातले आणि बिग बॉसच्या सदस्यांचा या दिवसात तिच्याकडे आवर्जून राबता असतो.
मेघाशी आणखी बातचित केलीये आमचे 'ई टीव्ही भारत'चे प्रतिनिधी विराज मुळे यांनी....