मुंबई - मराठी सिने नाट्य सृष्टीतील परिचित चेहरा असलेले ज्येष्ठ अभिनेते श्रीराम कोलहटकर यांचं आज सकाळी गिरगावातील राहत्या घरी निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने एक चतुरस्त्र अभिनेता हरपल्याची भावना सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीतुन व्यक्त होते आहे.
'आपला माणूस', 'एक अलबेला' आणि 'करले तू भी मोहब्बत' यांसारख्या चित्रपटातून श्रीराम कोल्हटकर यांनी आपल्या अभिनयाची दमदार छाप पाडली होती. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या 'आपला माणूस', 'एक अलबेला', 'करले तू भी मोहब्बत', 'अ डॉट कॉम मॉम', 'उंच भरारी' यातील भूमिका विशेष ठरल्या. एक चतुरस्त्र अभिनेते म्हणून ते ओळखले जात होते. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली होती.
डोंबिवलीतील टिळक नगर विद्यामंदिरात शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी पर्यतच शिक्षण पूर्ण केलं. मात्र, त्यांच्यात अभिनयाची आवड उपजतच होती. आधी हौशी आणि त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर काम केल्यानंतर त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करायला सुरवात केली. तर, अनेक मराठी दैनंदिन मालिकांमध्ये डॉक्टर, वकील, न्यायाधीश, वडील यासारख्या भूमिका साकारल्या होत्या. '
त्यांच्या एकाएकी जाण्याने त्यांचे मित्र आणि सिनेसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. एक उमदा नट आणि सच्चा मित्र गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.