मुंबई - अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भारतीय जनता पक्षाकडून पुण्यात माधुरी निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु होती. मात्र आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे माधुरीने म्हटले आहे.
माधुरी म्हणाली, ही केवळ अफवा आहे. मी कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही. या मुद्द्यावर मी याआधीच मत व्यक्त केलंय.
काही महिन्यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी माधुरी दीक्षितची भेट घेतली होती. त्यामुळे ती भाजपचा प्रचार करेल अथवा उमेद्वार असेल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र माधुरीने स्वतःच यावर पडदा टाकला आहे.
माधुरी सध्या नेटफ्लिक्सवरील मराठी वेबसिरीज १५ ऑगस्टच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. २९ मार्चला ही सिरीज रिलीज होणार आहे.