मुंबई - बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षी #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. अनेकांनी त्याचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले होते. याच कडीतील आता आणखी एक घटना समोर आली आहे. अभिनेत्री मानवी गगरुनेही अनेकदा कास्टिंग काऊचचा सामना केला.
मानवीने सांगितले, एका अनोळखी नंबरवरुन मला फोन आला. त्यांनी मला म्हटलं, की आम्ही एक वेबसीरिज तयार करत आहोत आणि त्यात आम्हाला तुला रोल द्यायचा आहे. त्यांनी मला बजेटही सांगितले. मी त्यांना म्हटलं हे बजेट खूप कमी आहे आणि आपण बजेटच्या गोष्टी का करत आहोत. आधी मला स्क्रीप्ट सांगा. मला ही कथा चांगली वाटली, तरच मी त्यात काम करेल. त्यानंतर आपण पैसे आणि वेळेबद्दल चर्चा करु. यावर तो म्हणाला मी तुमचे बजेट तीन पटही वाढवू शकतो. फक्त तुम्हाला तडजोड करावी लागेल.
अभिनेत्रीने सांगितले, की तडजोड हा शब्द ती जवळपास सात ते आठ वर्षांनी ऐकत होती. हा शब्द ऐकताच तिला प्रचंड राग आला. यासोबतच पोलिसांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे म्हणत ती त्या व्यक्तीवर चांगलीच भडकली. मानवीने 'फोर मोर शॉट प्लीज' या प्रसिद्ध वेबसीरिजमध्ये काम केले आहे याशिवाय 'शुभ मंगल ज्यादा सावधान' आणि 'उजडा चमन'सारख्या सिनेमांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत.