तामिळनाडूच्या रस्त्यावर लोकांचे अनेक जथ्थे मोठ्याने रडत, ओरडत शोक करीत सुपरस्टार मुरुथुर गोपालन रामचंद्रन यांच्या अंत्यसंस्काराला चालले होते. गर्दीतल्या एक महिला आक्रोश करीत म्हणत होती, 'थलाइवा, नी सोल्लामाई पोइट्टाए( नेता, तुम्ही आम्हाला न सांगताच निघून गेलात)'. आपल्या काखेतील मुलाला सावरत ती महिला एमजीआर यांची एक झलक पाहण्यासाठी तडफडत होती.
असं वाटतं होतं की तामिळनाडूचं ह्रदय बंद पडलं आहे. त्यांच्या जाण्यानं जेवढा शोक राजकीय नेत्यांना झाला होता तेवढाच जनतेला झाला होता. त्यांचे फुलांनी सजवलेले पार्थिव रस्त्यावरुन नेण्यात येत होते तेव्हा जनसागर आक्रंदन करीत होता. सगळीकडून लोकांचे रडण्याचे, आवाज येत होते.
जगात एमजीआर सारखा दुसरा नेता होणार नाही अशीच भावना अनेकजण बोलून दाखवत होते. त्यांच्यादृष्टीने देवाने आपला वंशज एमजीआर यांच्या रुपात पाठवला होता.
एमजीआर यांनी फिल्मी करियर सोडून अक्षरशः जनतेची राजासारखी सेवा केली. लोक त्यांना 'मक्काल थिलागम' म्हणत.
एम. जी. रामचंद्रन यांचे चरित्र अत्यंत उदार स्वरुपाचे होते. सर्वच सुपरस्टार्सना अशी संधी मिळत नाही. आपण अलिकडच्या काळात पाहिले की अनेक सुपरस्टार्सनी राजकारणात स्वतःला आजमावयाचा प्रयत्न केला. परंतु जे यश एमजीआर यांच्या वाट्याला आले तसे यश मिळणे कठीणंच.
तरुणपणी एम.जी. रामचंद्रन आणि त्यांचा भाऊ एम.जी. चक्रपाणी हे दोघे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नाटकमंडळ्यांमधून कामे करत असत. याच काळात ते गांधींच्या प्रभावामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले. १९३६ साली सती लीलावती नावाच्या तमिळ चित्रपटात मिळालेल्या एका साहाय्यक भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश झाला. १९४०च्या दशकात त्यांना चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळू लागल्या. पुढील तीन दशके तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाचा दबदबा राहिला. दरम्यान द्रविड मुन्नेट्र कळघम पक्षाचे ते सदस्य झाले. पक्षांतर्गत उतरंडीत झपाट्याने वाटचाल करत ते अल्पावधीतच पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळात गणले जाऊ लागले. चित्रपटांतील नायक म्हणून लाभलेल्या प्रचंड लोकप्रियतेचा वापर करून त्यांना राजकारणासाठीही मोठा जनाधार गोळा करता आला. १९७२ साली द्रमुक सोडून त्यांनी स्वतःचा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापला. १९७७ साली ते पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. भारतात कोणाही चित्रपट-अभिनेत्याने एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवण्याची ही पहिलीच घटना होती. १९८७ साली निधन होईपर्यंत ते मुख्यमंत्रिपदावर होते.
एमजीआरबद्दल सध्याचे तामिळ सुपरस्टार रजनीकांत म्हणतात, ''प्रत्येकजण एमजीआर बनू शकत नाही. मी मानतो की एमजीर क्रांतीकारी होती. हजार वर्षात दुसरा एमजीआर होऊ शकणार नाही. कोणी तसं म्हणत असेल तर तो वेडा आहे.''