मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री झिनत अमान या ७० आणि ८० च्या दशकातील एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. 'हरे रामा हरे कृष्णा', 'यादों की बारात', 'डॉन', 'कुर्बानी', 'लावारिस' आणि 'दोस्ताना' यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या बोल्ड भूमिका प्रचंड गाजल्या. त्या काळातही त्यांच्या बोल्ड सिन्सची प्रचंड चर्चा रंगली होती. आज त्यांचा ६८ वा वाढदिवस आहे. जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील काही घटनांविषयी...
झिनत यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५१ साली झाला. चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी १९७० साली 'मिस एशिया पॅसिफिक'चा ताज पटकावला होता. त्यानंतर त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रातही करिअर केलं. पुढे त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 'हलचल' हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
झिनत अमान यांच्या चित्रपट करिअरशिवाय त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही त्या चर्चेत असायच्या. चित्रपटांमध्ये ग्लॅमर आणि बोल्डनेस असणाऱ्या झिनत यांच्या वैयक्तिक आयुष्य मात्र, वाईट घटनांनी भरलेलं होतं.
१९७९ साली 'संपर्क' चित्रपटादरम्यान मजहर खान आणि झिनत यांचं नातं बहरलं होतं. दोघांनी पुढे चालून लग्नगाठही बांधली. मात्र, काही दिवसानंतर त्यांच्या नात्यात कटूता निर्माण झाली. मजहर हे झिनत यांना मारहाण देखील करायचे.
झिनत यांच्याशी लग्न झाल्यानंतरही त्यांचे दिलीप कुमार यांची भाची रुबिना मुमताज हिच्याशी अफेअर सुरू झाले होते. त्यानंतर झिनत यांनी मजहर यांना घटस्फोट देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच मजहर यांना किडनीविकार झाला होता. यातच त्याचं निधन झालं.
आपल्या नात्यात एवढे कष्ट असतानाही फक्त आपल्या मुलांसाठी हा त्रास सहन केला, असं झिनत यांनी एका माध्यमाच्या मुलाखतीत सांगितलं होतं. शेवटपर्यंत त्यांनी मजहर यांना साथ दिल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. 'मजहरमध्ये मला खरं प्रेम दिसंल होतं. माझ्या आईने आमच्या नात्याला नकार दिला होता. मात्र, मी आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मजहरसोबत लग्न केले होते', असंही त्यांनी सांगितलं होतं.
झिनत यांचं मजहर यांच्याशी लग्न होण्यापूर्वी त्यांचं नाव पाकिस्तानी क्रिकेटर आणि पंतप्रधान इमरान खान यांच्याशी जोडले गेले. ७०-८० च्या दशकात त्यांच्या अफेअरच्या चर्चा गाजल्या. पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यामध्येही झिनत हजेरी लावायच्या, असंही बोललं गेलं. मात्र, त्यांचं हे नातंही फार काळ टिकलं नाही. त्यामुळे त्यांनी पुढे मजहर खान यांच्याशी लग्न केलं होतं.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, झिनत अमान यांची 'पानिपत' या चित्रपटात भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्या 'सकिना बेगम'च्या भूमिकेत झळकणार आहेत.