मुंबई - 'कौन बनेगा करोडपती'च्या ११ व्या सीझनमध्ये अमरावतीच्या अंजनगावच्या बबिता ताडे यांनी १ करोड रुपयाचं बक्षीस जिंकलंय. या घटनेमुळे आपल्या संघर्षमय जीवनाची आश्रिती झाल्याची भावना त्याच्या मनात दाटून आली आहे. मिळालेल्या पैशाचं नक्की काय करायचं आहे, त्यांची स्वप्नं काय आहेत, याबाबत खुद्द बातचीत केलीये बबिता ताडे यांनी...
या कार्यक्रमात 'बिग बी' अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून आपल्यात एक सकारात्मक ऊर्जा मिळाली असल्याचं त्यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. गेल्या १८ वर्षांपासून अंजनगावच्या शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी खिचडी शिजवून देण्याचं काम त्या करत होत्या. गरीब मुलांना दोन घास जेवण वेळेवर मिळावं यासाठी अवघे दीड हजार रुपये मिळून सुद्धा आपण हे काम पूर्ण प्रामाणिकपणे करत असल्याचं या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांना सांगितलं. त्यांचा हा संघर्ष पाहून खुद्द बिग बी सुद्धा भारावून गेले होते.
या कार्यक्रमात जिंकलेल्या बक्षिसाच्या रक्कमेतील काही रक्कम स्वतःची मुलगी आणि मुलाच्या शिक्षणासाठी राखून ठेवणार असल्याचं त्यानी सांगितलं. त्यानंतर उरलेल्या रक्कमेतून गावातील भग्नावशेषात असलेलं शिव मंदिर बांधणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा -महिन्याला दीड हजार कमावणाऱ्या अमरावतीच्या बबिता ताडे झाल्या करोडपती, पाहा व्हिडिओ
बबिता यांना स्वतः शिक्षणाची प्रचंड आवड आहे. मात्र परिस्थितीमुळे लवकर लग्न झाल्यामुळे त्यांना पुढे शिक्षण घेणे शक्य झालं नाही. तरीही मध्यान्ह भोजनाच काम करून त्यांनी दोन वेळा स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या थोडक्या मार्कांनी उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे केबीसीमध्ये आल्यावर त्यांना पुढच्या शिक्षणासाठी स्वतःचा मोबाईल हवा होता. बिग बी यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी स्वतः त्यांची ही इच्छा पूर्ण केली. कार्यक्रमात त्यांना एक नवीन फोन देऊ केला. हा फोन वापरून आपण पुन्हा नक्की स्पर्धा परीक्षा देणार असल्याचे बबिता ताईंनी सांगितलं आहे.
हेही वाचा -'सुटकेस' शोधण्यासाठी रंगलेला मनोरंजक ड्रामा, पाहा 'लूटकेस'चा ट्रेलर
या कार्यक्रमात १ करोड रुपये जिंकल्याची बातमी जशी गावात पसरली तसा सगळ्यांनाच त्याचा फार आनंद झाला आहे. प्रत्येकाने स्वतःच हे बक्षीस मिळवलं असल्याप्रमाणे लोक आनंदात आहेत. सगळेजण बबिता ताई आणि त्यांचे पती कधी एकदा गावात परततात याची आतुरतेने वाट पहात आहेत.
घरातील परिस्थिती सुधारावी यासाठी पैशाची गरज असल्याने आपण केबीसींमध्ये भाग घेतला. मात्र, ज्या कुणाची आपल्या प्रयत्नावर खरी निष्ठा असेल आणि एखाद स्वप्न पूर्ण करून दाखवण्याची जिद्द असेल तर नक्की या कार्यक्रमात भाग घ्यावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.
हेही वाचा -पाहा, 'शुभमंगल ज्यादा सावधान'च्या इरसाल फॅमिलीची खुमासदार झलक