मुंबई - 'धडक' चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेल्या ईशान खट्टरची बॉलिवूडमध्ये चांगली ओळख निर्माण झाली आहे. मात्र, ईशानने 'धडक' चित्रपटापूर्वी 'बियॉन्ड द क्लॉऊड्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने एक महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'बियॉन्ड द क्लॉऊड्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन मजीद मजीदी यांनी केले होते. २४ मे रोजी हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट 'मॉम' देखील प्रदर्शित होणार आहे.
चीनमध्ये भारतीय चित्रपटांना विशेष पसंती दिली जाते. अलिकडेच आयुष्मान खुरानाच्या 'अंधाधून' चित्रपटानेही चीनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. 'अंधाधुन'ची घोडदौड सुरु असताना, आता आणखी दोन चित्रपट चीनी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
ईशानला 'बियॉन्ड द क्लॉऊड्स' चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. आता हा चित्रपट चीनी प्रेक्षकांवर कसा प्रभाव टाकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.