'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' यासारख्या यशस्वी सिनेमांचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हा सध्या याच मालिकेतील पुढच्या 'जंगजोहर' या सिनेमाच्या निर्मितीत व्यस्त आहे. मात्र 'फत्तेशिकस्त' या सिनेमाच्या यशाच्या पार्टीमध्ये नुकतेच त्यानें त्याचे पुढचे प्लॅन्स ईटीव्ही भारतसोबत बोलताना स्पष्ट केले.
शिवाजी महाराज्यांच्या आयुष्यातील महत्वाचा प्रसंगावर सिनेमे बनवणे हा आपला ध्यास असल्याचं दिग्पाल याने अनेकदा सांगितलं आहे. त्यांच्या आयुष्यातील पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी कोंडाजी फर्जंद यांनी दाखवलेलं धाडस आणि महाराजांनी स्वतः पुण्यतील लाल महालावर चाल करून केलेला सर्जिकल स्ट्राईक दोन सिनेमातून त्याने मांडला. आता बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेने केलेल्या पराक्रमाचे चित्रण त्याच्या जंगजोहर सिनेमातून तो दाखवणार आहे. याशिवाय याच मालिकेतील अजून पाच सिनेमे दिग्पाल आपल्या भेटीला आणणार असून ते आपल्या करिअरचे मुख्य उद्दिष्ट असल्याचं त्याच सांगणं आहे.
'फर्जंद' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 16 कोटीपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली होती, तर 'फत्तेशिकस्त' या सिनेमाने 15 कोटी पर्यंत कमाई केल्याचं दिगपालच सांगणं आहे. त्यामुळे ऐतिहासिक विषय नीट अभ्यासपूर्णरित्या मांडले तर ते प्रेक्षकांना नक्की पाहायला आवडतात हे त्याने दाखवून दिलेले आहे.
शिवाजी महाराजांवर आठ सिनेमे बनवल्यानंतर मात्र मराठीतील अभिजात साहित्यकृतीवर सिनेमे बनवण्याची इच्छा असल्याचं त्याने ईटीव्ही भारताला सांगितले. गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे यांच्या कथा आपल्याला खुणावत असल्याचं त्याने सांगितलं. आपल्याकडील साहित्य हे फारच समृद्ध असून त्यातील काही निवडक कादंबऱ्यांचे पटकथेत रूपांतर करून तयार ठेवलं असल्याचं त्याने स्पष्ट केलं. हे आठ सिनेमे पूर्ण केल्यानंतर मात्र या कथांवर सिनेमे बनवण्याची आपली इच्छा असून ती देखील लवकर पूर्ण करणार असल्याचे त्याने सांगितलं. त्याच्याशी याबाबत बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी विराज मुळेने..