मुंबई - बॉलिवूडवर अनेकवर्षे आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणाऱ्या राज कपूर यांचा आर.के. स्टुडिओ अखेर गोदरेज प्रॉपर्टीने विकत घेतला. आर.के स्टुडिओ विकणे हा कपूर कुटुंबीयांसाठीही सोपा निर्णय नव्हता. या स्टुडिओमध्ये 'मेरा नाम जोकर' पासून तर 'आवारा' पर्यंतचे अनेक सुपरहिट चित्रपट तयार झाले. भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळासाठी आर.के. स्टुडिओ मैलाचा दगड ठरला. मात्र, आता हा स्टुडिओ इतिहासजमा होणार आहे.
कपूर कुटुंबियांनी 'आर.के. स्टुडिओ'चे मालकी हक्क 'गोदरेज'कडे दिल्यानंतर रणधीर कपूरही भावुक झाले होते. २०१७ साली स्टुडिओला लागेलेल्या आगीत स्टुडिओचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचा खर्च आणि उत्पन्न यात बरीच तफावत निर्माण झाल्यामुळे अखेर तो विकण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, भारतीय सिनेसृष्टीला अजरामर अशा कलाकृती देणाऱ्या राज कपूर यांच्या स्मृती जिवंत राहाव्या म्हणून खुद्द भारतीय चित्रपट आणि दुरचित्रवाणी दिग्दर्शक संघटना (IFTDA) समोर आली आहे.
'इंडियन फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन डायरेक्टर्स असोसिएशन'ने गोदरेजला एक विनंती पत्र पाठवले आहे. ३३००० वर्ग मीटर पसरलेल्या या स्टुडिओच्या जागेत काही प्रमाणातील जागा ही राज कपूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संग्रहालय बनवण्यासाठी वापरावी, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. राज कपूर यांच्या नावानेच हे संग्रहालय तयार करावे, असेही या पत्रात म्हटले आहे.
'राज कपूर हे स्वत:च एक मोठे नाव आहे. अनेक दिग्दर्शकांची ते प्रेरणा, मार्गदर्शक आणि माध्यम आहेत. त्यामुळे त्यांच्या स्मृतीपटलावरच्या काही स्मृती या संग्रह करून ठेवाव्यात, जेणेकरून त्यांची आठवण त्या जागेवर कायम राहील. या संग्रहालयासाठी काहीही मदत करण्यास तयार आम्ही सदैव तत्पर राहू, असेही यामध्ये म्हटले आहे.