काही कलाकारांचा चित्रपटसृष्टीमध्ये मोठा दबदबा असतो, मान असतो. एखाद्या चित्रपटामध्ये त्यांचं असणंही त्या चित्रपटासाठी मोठी जमेची बाजू असते. त्यांनी या क्षेत्रात दिलेलं मोठं योगदान त्यामागे असतं. असे कलाकार मोजकेच चित्रपट करतात मात्र, त्यांनी केलेली निवड खूपच अभ्यासपूर्ण असते. अशाच काही मोजक्या कलाकारांपैकी एक मोठं नाव म्हणजे गिरीश कर्नाड. तब्बल ३३ वर्षांनंतर गिरीश कर्नाड यांनी मराठी चित्रपटामध्ये भूमिका केलीय. मात्र दुर्दैवाने त्यांच्या आयुष्यातील ती अखेरची भूमिका ठरली.
'उंबरठा' या गाजलेल्या मराठी चित्रपटात गिरीश कर्नाड यांनी भूमिका केली होती. ३३ वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटीलच्या पतीची भूमिका केली होती. त्यानंतर अद्याप त्यांनी कोणताही मराठी चित्रपट केलेला नाही.
‘सरगम’ हा चित्रपट एक १६ - १७ वर्षांच्या तरुण-तरुणीची प्रेमकथा आहे. मात्र, या चित्रपटात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचीही मोठी भूमिकाही आहे.
आयुष्यात सारं काही मिळवून झाल्यानंतर हे सगळं वैभव म्हणजे आयुष्य नव्हे, असा विचार करून एक व्यक्ती जंगलामध्ये निघून जाते आणि पुढचे आयुष्य तिथेच घालविते. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या या व्यक्तीची भूमिका कर्नाड यांनी साकारली आहे.
चित्रपट दिग्दर्शक शिव कदम
यांनी कर्नाड यांच्या घरी जाऊन त्यांच्या चित्रपटाची कथा त्यांना ऐकविली. कथा ऐकताच त्यांना ती विलक्षण आवडली आणि त्यांनी लगेचच या चित्रपटात काम करण्यास होकार दिला, त्यामुळे ३३ वर्षांनंतर या मोठ्या कलाकाराला मराठीत पुन्हा अभिनयासाठी घेऊन येण्याची संधी चित्रपट निर्माते महेंद्र केसरी व कदम यांनी मिळवून दिली.
ती भूमिका गिरीश कर्नाड यांच्याशिवाय अन्य कोणी करू शकणार नाही, याबद्दल मला खात्री होती. त्यामुळे त्यांनीच करावी यासाठी मी आग्रही होतो. त्यांनीदेखील कथा आणि त्यांचे पात्र ऐकून घेताच ती भूमिका करण्यास होकार दिला. गिरीशजी काम करणार ही माझ्यासह मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी गोष्ट होती. हा चित्रपट निःसंशय उत्कृष्ट तयार होईल. असे चित्रपट दिग्दर्शक शिव कदम आणि निर्माते एम के धुमाळ यांनी सांगिलते ते पुढे म्हणाले.
अस असलं तरीही 'सरगम' हा चित्रपट सध्या सेन्सॉरच्या कात्रीत अडकला असून तो लवकरच प्रदर्शित करू अशी ग्वाही निर्माता आणि दिग्दर्शकांनी दिली आहे. मात्र गिरीश कर्नाड यांच्या अचानक जाण्याने सिनेमच्या टीमला मोठा धक्का बसलाय.