मुंबई - सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अनेक गाजलेले चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिका ज्यांच्या नावावर आहेत, असे समीर जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं.
‘मिस यू मिस्टर’ हा एक कौटुंबीक मनोरंजनात्मक चित्रपट असून तो नातेसंबंधांवर बेतलेला आहे. या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यात राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर यांचा समावेश आहे. या चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली, की समीर जोशी यांच्यासोबतचा हा माझा दुसरा चित्रपट असून याआधी मी त्यांच्या 'मामाच्या गावाला जाऊया' या सिनेमामध्ये काम केले होते. 'मिस यू मिस्टर'मध्ये ती 'कावेरी' नावच्या मुलीची भूमिका साकारत आहे.
सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्त एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमामध्ये देखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. याबद्दल समीर जोशी म्हणतात, “ही फक्त वरुण आणि कावेरीची गोष्ट नाही, तर कामानिमित्त एकमेकांपासून दूर असलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. जर असं अंतर पडलं तर ते मिटवण्यासाठी काय करावं, या सर्वाबद्दल हसत-खेळत तर कधी डोळ्यांच्या कडा ओलावत सांगितलेली ही गोष्ट आहे”.