पुणे - ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे आज पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी रंगभूमीवर त्यांनी आपल्या अभिनयाने एक वेगळी छाप उमटवली. अत्यंत अभ्यासू आणि शिस्तप्रिय कलाकार अशी त्यांची ओळख होती.
श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ ला सातारा येथे झाला. मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच १९६९ मध्ये त्यांनी नाट्य कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांच्या पत्नी दिपा लागू यादेखील टीव्ही अभिनेत्री होत्या.
श्रीराम लागू यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. १०० हून अधिक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. १९७८ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘नटसम्राट’ नाटकातली अप्पासाहेब बेलवलकर ही त्यांची भूमिका विशेष गाजली.