मुंबई - सत्य साईबाबांना प्रति साईबाबा म्हटले जात होते, त्यांच्यावर अनेक मान्यवर व्यक्तींची श्रद्धा होती. अगदी सामान्यजनांपासून ते मोठमोठे फिल्मस्टार्स, क्रिकेट स्टार्स, माननीय जजेस, राजकारणी, राष्ट्रपती, वरिष्ठ सरकारी अधिकारी या सर्व वर्गातील, जात-पात, धर्म यापलीकडे जाऊन त्यांचा चाहतावर्ग होता ज्यांची त्यांच्यावर निस्सीम भक्ती होती. ‘थलयवा’ रजनीकांत, ‘मिस वर्ल्ड’ आणि बॉलिवूडची टॉपची हिरॉईन ऐश्वर्या राय बच्चन व आपल्या सर्वांचा लाडका क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचीसुद्धा सत्य साईबाबांवर निस्सीम भक्ती होती. ते भोंदूपणा करतात असे अनेकांनी त्यांच्यावर आरोप केले. मात्र, त्यांनी कुणाचाही दुस्वास केला नाही. वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी आपण शिर्डीचे साईबाबा आहोत व पुनर्जन्म घेऊन जन्माला आलो आहोत असे ठामपणे सांगत घर सोडले व जनतेची सेवा करू लागले. त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक, ‘सत्य साईबाबा’ बनविण्यात आला असून तो दिग्दर्शित केलाय विकी राणावत यांनी.
सत्य साईबाबांची महती अधोरेखित करणारा चित्रपट, ‘सत्य साईबाबा’! आपल्या देशात आध्यात्माला खूप महत्त्व दिले जाते. पाश्चिमात्य देशांनी विज्ञानात कितीही प्रगती केली असली तरी भारताकडे असलेल्या सांप्रदायिकतेमुळे जग मनःशांती साठी आपल्या देशाकडे बघते. आध्यात्म्याकडे झुकणारा आपला समाज गुरू शोधू लागला होता व काही उत्तम गुरू होऊनही गेले. पण तोतया गुरुसुद्धा उदयास आले, हातचलाखी करत भोळ्या भक्तांना फसवणारे अनेक निघाले. त्यामुळे प्रामाणिक गुरूंकडेदेखील लोक साशंक नजरेने बघू लागले. एकतर प्रचंड लोकसंख्या व अप्रगत देश यामुळे नशिबावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढतच गेली आणि त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेणारी कपटी गुरू मंडळी उदयास आली. मात्र, काही मोजके ‘सत्य’ गुरु होऊन गेले त्यात ‘सत्य साईबाबा’ मोडतात. ते स्वतःला शिर्डीच्या साईबाबांचे अवतार म्हणून सांगत परंतु अनेकांनी त्यांच्यावर सुरुवातीला विश्वास ठेवला नाही. त्यांना वारंवार चमत्कार करीत वारंवार सिद्ध करावे लागले की तेच साईबाबांचे अवतार आहेत.
सत्य साईबाबांची महती अधोरेखित करणारा चित्रपट, ‘सत्य साईबाबा’! ‘सत्य साईबाबा’ चित्रपटाचे कथानक सत्या च्या लहानपणापासून सुरू होतो. बालवयातच दैवी शक्ती लाभलेल्या सत्या ला नेहमीच ओरडा मिळत असतो, गावाचे मुखिया (गोविंद नामदेव), वडील यांच्याकडून थोडा अधिकच. तो साईबाबांचा पुनर्जन्म घेऊन पृथ्वीवर आला आहे असे सांगत असतो. त्याच्यावर विश्वास असतो तो केवळ त्याच्या आईचा (किशोरी शहाणे वीज). सत्या दक्षिणेतील पुट्टपूर्ती गावात जन्मलेला व गावाच्या वेशीपलीकडेही कधी न गेलेला, शिर्डीमधील कडुलिंबाचे झाड जिथे साईबाबा बसायचे व इतर गोष्टींबद्दल सांगतो तेव्हा मुखिया शिर्डीला जातो. तिथे गेल्यावर तो चाट पडतो कारण सत्या ने वर्णन केल्याप्रमाणे सगळं काही तंतोतंत जुळत असते व तो गावी परतून सत्याच्या पायाशी लोळण घालतो. इथून सत्य साईबाबा (अनुप जलोटा) पंचक्रोशीत व नंतर देश व विदेशात प्रसिद्ध होतात. त्यांनी केलेले चमत्कार अनेकांनी विज्ञानाच्या तराजूत मोजून पाहिले परंतु काहीही वावगं सापडले नाही. ते नेहमी म्हणत ‘चमत्कार’ माझं ‘विझिटिंग कार्ड’ आहे, त्यामुळेच माझ्याकडे देश विदेशाच्या कान्याकोपऱ्यातून लोक भेटीला येतात. चित्रपटात हे संदर्भ व उल्लेख आले आहेत. दुसरीकडे काही राजकारणी व गुंड (झाकीर हुसेन, मुरली शर्मा) त्यांचा फायदा घेऊ पाहतात परंतु साहजिकच त्यात त्यांना यश मिळत नाही. साईबाबांचा खरेपणा शोधण्यासाठी एक इन्स्पेक्टर (जॅकी श्रॉफ) तपास करीत असतो पण त्याची पत्नी (साधिका रंधावा) मात्र सत्य साईबाबांची भक्त असते. साईबाबांमुळेच इन्स्पेक्टरचा जीव वाचतो व तो खलनायकांचा नायनाट करतो.
सत्य साईबाबांची महती अधोरेखित करणारा चित्रपट, ‘सत्य साईबाबा’! सत्य साईबाबांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. जिथे आधी साधे रस्तेही नव्हते त्या पुट्टपूर्ती गावाचा कायापालट करत हॉस्पिटल, शाळा, कॉलेज आणि इतर समाजोपयोगी साधनं त्यांनी उभारली. सर्वांना शिक्षण, मोफत उपचार यासारख्या उपक्रमांमुळे त्यांच्याबद्दल आदर वाढतच गेला. एस सचिंदर हे या बायोपिकचे लेखक असून त्यांनी अनेक घटना तपासून, अनेकांशी संवाद साधून व सत्य साईबाबांवरील साहित्याचा अभ्यास करून कथानक लिहिले असून सादरीकरणात तथ्य जाणवते. दिग्दर्शकानेही चित्रपटाला विषयाच्या बाहेर जाऊ दिलेले नाहीये. खरंतर ही बायोपिक डॉक्युमेंटरी वाटू न देणे हे त्याचे यश आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र, सत्य साईबाबांचं कार्यक्षेत्र खूप मोठे होते ते चित्रपटातून निसटल्यासारखे वाटते. गाण्यांचा उपयोग फक्त मनोरंजनासाठीचा आहे व संकलकाने चित्रपट आटोक्यात (१२१ मि) ठेवला आहे. अभिनयात झाकीर हुसेन, मुरली शर्मा, अशोक बांठिया यांनी चांगले काम केली. गोविंद नामदेव उत्तम व जॅकी श्रॉफ भाव खाऊन जातो. भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा हे सत्य साईबाबांच्या गेट-अप मध्ये चपखलपणे बसले आहेत व त्यांनी कामही चांगल्या प्रकारे निभावले आहे. सत्य साईबाबांच्या भक्तांसाठी बहुभाषिक (हिंदी, इंग्लिश,मराठी, तेलगू) ‘सत्य साईबाबा’ हा चित्रपट पर्वणी ठरेल.
सत्य साईबाबांची महती अधोरेखित करणारा चित्रपट, ‘सत्य साईबाबा’!