मुंबई - छोट्या पडद्यावरील 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'सूर नवा ध्यास नवा' या रिअॅलिटी शोचं तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वात ५ वर्षापासून ते ५५ वर्षांपर्यंत असलेल्या स्पर्धकांचा सहभाग राहणार आहेत. त्यामुळे तीन पिढ्यांना एका सुत्रात गुंफण्याचं आव्हान समोर असल्याचं कार्यक्रमाची सुत्रसंचालिका तसेच अभिनेत्री स्पृहा जोशी हिने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
स्पृहा यापूर्वी झालेल्या 'सूर नवा'च्या 'छोटे सुरवीर' या पर्वात देखील या कार्यक्रमाची सूत्रसंचालक होती. त्या पर्वात मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळ आणि स्पृहाने मिळून फारच धमाल केली होती. मात्र, यावेळी सर्व वयोगटातील स्पर्धक असल्याने तिच्यावरील जबाबदारी अधिकच वाढली आहे.
हेही वाचा -'सरदार उधम सिंग'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशलची सुवर्णमंदिराला भेट
यावेळी वेगवेगळे स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. यात काही लहानग्यांचा नुकताच गायनात श्रीगणेशा होत आहे. तर, काही तरुण गायक परिस्तितीशी दोन हात करत आपली गाण्याची आवड जपत आहेत. यामध्ये काही ज्येष्ठ मंडळींचाही सहभाग राहणार आहे. आयुष्यात खूप इच्छा असूनही तीचं करिअरमध्ये रूपांतर करू शकले नाहीत. त्यामुळे उतारवयात आपलं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते या शो मध्ये सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा -विद्या बालनच्या 'शकुंतला देवी' बायोपिकमध्ये 'दंगल गर्ल' साकारणार 'ही' भूमिका
कार्यक्रमाची सुरुवात एवढी दणक्यात असेल तर फिनाले किती जबरदस्त असेल, अशी भावना मनात असल्याचं स्पृहाने यावेळी सांगितलं.