मुंबई - दिग्दर्शक रुमी जाफरी यांच्या आगामी 'चेहरे' चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. आता इमरान हाश्मीचाही फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
'चेहरे' हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एन्टरटेन्मेंट अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
इमरान हाश्मीने आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटामध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्याचा 'व्हाय चीट इंडिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता पुन्हा एकदा दमदार भूमिकेत इमरानला पाहायला मिळणार आहे.