मुंबई - काही काळापासून मराठी चित्रपटांच्या नावात इंग्रजी शब्द वसू लागले. मराठी तरुणाईला आकर्षित करत मराठी चित्रपट बघण्यासाठी उद्युक्त करण्याचा तो प्रयत्न होता असे आपण म्हणू शकतो. सध्या नव्या पिढीवर तंत्रज्ञानाचा पगडा आहे म्हणून हल्लीच्या चित्रपटांच्या नावात त्यांची ‘लिंगो’ (भाषा या शब्दासाठी अपभ्रंशित इंग्रजी शब्द) वापरण्यात येऊ लागली आहे. चित्रपट ‘इमेल फिमेल’ हे त्यातीलच एक उदाहरण.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. याच यादीतील ‘इमेल फिमेल’ हा मराठी चित्रपट आता नव्या उत्साहात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होतोय. येत्या २६ फेब्रुवारीला ‘इमेल फिमेल’ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘एस.एम.बालाजी फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.
‘इमेल फिमेल’ ची बाजू
आज माणसाच्या दैनंदिन गरजेमध्ये सोशल मीडियाची भर पडलेली आहे. लहान असो वा मोठे सर्वांनाच सोशल मीडियाचं वेड लागलं आहे. प्रत्येक नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसंच सोशल मीडियाच्या बाबतीतही चांगली आणि वाईट अशा दोन बाजू पहायला मिळतात. या दोन्ही बाजू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करत प्रलोभनाला बळी ठरलेल्या एका मध्यमवर्गीय शंतनूची गोष्ट ‘इमेल फिमेल’ चित्रपटातून मांडण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या खूप व्यक्ती असतात. पण त्यांच्यासोबत भरकटत जाणारे सुजाण आणि सुशिक्षित तरुणही यांसारख्या गोष्टींना तेवढेच जबाबदार असतात हे दाखवण्याचा प्रयत्न ‘इमेल फिमेल’च्या माध्यमातून केला आहे. करमणूकीसोबत प्रबोधन करणारा हा चित्रपट प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरेल असा विश्वास दिग्दर्शक योगेश जाधव व्यक्त करतात.
२६ फेब्रुवारीला ‘इमेल फिमेल’ प्रदर्शित होणार
निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन यांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. छायांकन मयुरेश जोशी तर कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. सोनू निगम, जावेद अली, आनंदी जोशी, ममता शर्मा यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड आणि अभिजीत नार्वेकर यांनी संगीताची तर पार्श्वसंगीताची जबाबदारी प्रकाश नर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा सुहास गवते आणि देवयानी काळे यांची आहे. कार्यकारी निर्माते स्वप्नील वेंगुर्लेकर आहेत. निर्मिती सल्लागार अविनाश परबाळे आहेत.