मुंबई - सोनी मराठी वाहिनीवर दाखल होणाऱ्या एका नवीन मालिकेचा प्रोमो सध्या सगळ्याचंच लक्ष वेधून घेत आहे. ही मालिका म्हणजेच एक होती राजकन्या. कवी सौमित्र म्हणजेच अभिनेते किशोर कदम यांच्या गाजलेल्या बघ माझी आठवण येते का या कवितेवर आधारित शब्द रचून या प्रोमोतून राजकन्येची गोष्ट मांडण्यात आली आहे. मात्र, या कवितेच्या विरुद्ध घटना तिच्या आयुष्यात घडताना दिसतात.
अभिनेते किशोर कदम हे या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत असून अभिनेत्री किरण ढाणे ही अवनीच्या म्हणजेच त्यांच्या लेकीच्या भूमिकेत आहे. शेगावमध्ये राहून डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अवनीला वडिलांचं आकस्मिक निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे मुंबईत यावं लागतं. इथे आल्यावर ती पोलिसात भरती होण्याचा निर्णय घेते. त्यानंतर तिच्या आयुष्यात नक्की काय घडतं, ते या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन गौतम कोळी करणार आहेत. तर त्यात किशोर कदम, शीतल क्षिरसागर, गणेश शिरसेकर असे अनेक नावाजलेले कलाकार काम करताना दिसतील. या मालिकेतून घर आणि स्वप्नपूर्तीचा प्रवास करणाऱ्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट मांडण्यात येणार आहे. नुकतंच मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत या मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट रिव्हील करण्यात आली.