मुंबई - लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या विचारांचे सह-अस्तित्व असले पाहिजे, असे मत अभिनेता जावेद जाफरी यांनी व्यक्त केले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जावेद यांनी केलेल्या टिप्पणीवर लोकांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी माफीदेखील मागितली होती.
प्रसिध्द कॉमेडियन जगदिपचा मुलगा असलेल्या जावेद जाफरी यांनी म्हटले, "माझे मत लोकांच्या मताशी जुळत नसेल तर राष्ट्र विरोधी ठरवणे चुकीचे आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या देशात असे होऊ शकत नाही."
जावेद पुढे म्हणातात, "दुसऱ्यांवर आपली मते लादण्याचा जे प्रयत्न करतात आणि वेगवेगळी मते व्यक्त करणाऱ्यांना दाबू इच्छीतात त्यांची संख्या कमी आहे, परंतु दुर्दैवाने त्यांचाच गोंगाट अधिक असतो."
१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्यानंतर जावेद जाफरी यांनी ट्विटरवर लिहिले होते, "ते स्वतःला 'जैश-ए-मोहम्मद' समजतात...पैगंबराच्या मागे दडणे आणि इस्लामच्या नावावर अमानवी आणि घृणास्पद कृत्य करणे लाज वाटण्यासारखे आहे. त्या तमाम धार्मिक संघटना आणि सरकारांची लाज वाटते जे अप्रत्यक्ष गप्प राहून यांचे समर्थन करतात."
या ट्विटनंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला आणि त्यांनी माफी मागितली. त्यांनी ट्विटरवर म्हटलंय, "जे दोस्त, फॉलोअर्स आणि भारतीय सहकारी माझ्या ट्विटमुळे दुखावले आहेत मी त्यांची मनापासून माफी मागतो. याचा जो अर्थ काढण्यात आला ते माझे म्हणणे नव्हते. हे चुकीच्या शब्दांची निवड होती. कृपया मला जज करण्यापूर्वी दहशतवादी आणि पाकिस्तानची निंदा केलेल्या पहिल्या ट्विटसना टाईमलाईनवर वाचा."
आपले मत मोकळेपणाने मांडत असताना भीती वाटते का ? असे विचारले असता ते म्हणाले, "त्या लोकांना हेच हवे आहे. त्यांच्या गोंगाटामुळे साध्य होत नसेल तर ते आमचा आवाज दाबू पाहतात. परंतु मी असे करणार नाही. मी सच्चा लोकशाहीवर विश्वास ठेवतो. प्रत्येकाचा आवाज ऐकला गेला पाहिजे. वेगवेगळ्या विचारांचे सह-अस्तत्व असले पाहिजे आणि कोणत्याही पातळीवर भेदभाव नसला पाहिजे."
जावेद जाफरी लवकरच झी ५ च्या 'द फाइनल कॉल' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.