मुंबई - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सिनेसृष्टीलादेखील बसला आहे. अशात आता हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझने या महामारीदरम्यान सिनेमाचं शूटींग करण्यासाठी एक पर्याय शोधला आहे. अभिनेता चित्रपटाच्या कलाकार आणि क्रू मेंबर्ससाठी एक कोरोनामुक्त गाव बनवण्याची योजना आखत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून वाचत 'मिशन इम्पॉसिबल 7' चे चित्रीकरण करण्यासाठी हा उपाय शोधला गेला आहे.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आधीच खूप उशीर झाला आहे. अशात आता कोरोनामुळे सर्व काही पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार आहे. अशात सिनेमाचं चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करुन चित्रपटाच्या टीमला सुरक्षित ठेवण्यासाठी हा पर्याय निवडला गेला असल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अनेक हॉटेलही बंद असल्याने हॉटेल रुम मिळणे कठीण आहे. हे सर्व सुरळीत सुरु होण्यासाठी अजून कालावधी लागणार आहे. अशात अनेक मोठे कलाकार आपल्या टीमसोबत महागड्या ठिकाणी राहून काम करत आहेत. मात्र, टॉम नेहमीच सर्वांपेक्षा वेगळं काहीतरी करत असतो. मिशन इम्पॉसिबलच्या सर्व भागांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवले आहे. अशात नवीन भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
चित्रपट निर्माता क्रिस्टोफर यांचा 'मिशन इम्पॉसिबल 7' चित्रपट 23 जुलै 2021 ला प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सिनेमाचं चित्रीकरण थांबलं. आता हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे.