मुंबई - विवेक ओबेरॉयचा पाय खोलात जाताना दिसत आहे. ऐश्वर्या रायच्या खासगी आयुष्यावरील मिम शेअर करुन त्याने खळबळ उडवून दिली होती. यावर भरपूर टीका झाल्यानंतरही तो आपल्या मताशी ठाम होता. अखेर वाढत्या टीकेपुढे त्याने माफी मागत मिमचे ट्विट डिलीट केले आहे. दरम्यान त्याच्या विरोधात महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघांनी राज्या महिला आयोगाची भेट घेतली. त्यांनी विवेक ओबेरॉयवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याच्यावर खटला दाखल करावा अशा मागणीही वाघ यांनी केली आहे.
याबात बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, ''भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ जे अभिनेता उतरलेत, त्यांनी महिलांच्या सन्मानाकडे बिल्कुल लक्ष दिलेले नाही. ज्या व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय, अशा अभिनेत्रीचे फोटो एक्झिट पोलच्या संबंधात वापरलेत हे खूप आक्षेपार्ह आहे. ही केवळ त्या अभिनेत्रीची गोष्ट नाही तर देशातील संपूर्ण महिलांच्या सन्मानाला धक्का लागला आहे. इतकेच नाही तर यात त्यांची छोटी मुलगीही दिसून येते. आमची महिला आयोगाच्या सदस्यांशी बातचीत झाली. अशा लोकांच्यावर केस दाखल झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही केली. देशातील लाखो महिलांचा सन्मान राखला पाहिजे यासाठी राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोगाने पाऊले उचलली पाहिजेत.''
दरम्यान राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाने विवेक ओबेरॉयला नोटीस बजावली आहे. याबद्दल बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, ''अर्थात, त्यांनी जारी केलेल्या नोटीसीची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याच्यावर तक्रार दाखल झाली पाहिजे.''