मुंबई - बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांनी अलिकडेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओत बोमण इराणी हे ऑटोरिक्षा चालवणाऱ्या महिलेबरोबर पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओच्या व्हायरल होण्यामागचे कारणही तसेच आहे. कारण, ऑटोरिक्षा चालवणारी ही महिला मराठी मालिकेची अभिनेत्री आहे.
होय, दिवसा मराठी मालिकेंमध्ये अभिनय करणारी लक्ष्मी रात्री ऑटोरिक्षा चालवते. बोमण यांनी रस्त्यावरून जाताना तिला ऑटोरिक्षा चालवताना पाहिले. तिला पाहुन बोमण भारावून गेले होते. त्यांनी तिच्यासोबत ऑटोरिक्षातून प्रवास केला. तसेच तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पाही मारल्या. लक्ष्मी एक रिअल हिरो असल्याचे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हटले आहे. तसेच, इतरांसाठी ती प्रेरणा आहे. ती उर्जेचा भरभक्कम स्रोत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तर, बोमण यांना भेटून आपला आनंद शब्दात व्यक्त करता येत नसल्याचे लक्ष्मीने या व्हिडिओत म्हटले आहे. बोमण यांना भेटून लक्ष्मीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही लक्ष्मीचे भरभरून कौतुक केले आहे.