मुंबई - राजकुमार हिराणींची कौटुंबिक पार्श्वभूमी काही सिनेक्षेत्रातील नव्हती. त्यांच्या वडिलांचा त्यांचा टायपिंग स्कूलचा व्यवसाय होता. मात्र, आपण काहीतरी वेगळे करायचे ठरवलेल्या राजकुमार यांनी वडिलांचा व्यवसाय न निवडता नाटकाकडे लक्ष केंद्रीत केले.
राजकुमार यांनी पुण्याच्या टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये हीरो होण्यासाठी प्रवेश घेतला. मात्र, शिकताना त्यांचा इरादा बदलला. त्यांनी कोर्स बदलला आणि दिग्दर्शनात प्रवेश घेतला. १९९३मध्ये त्यांनी आपला मोर्चा सिनेमाकडे वळवला. जाहिरातीच्या क्षेत्रातही स्वतःला आजमावले. १९९४ मध्ये त्यांनी '1942 ए लव स्टोरी', आणि १९९८ मध्ये 'करीब' या सिनेमांचे प्रोमो त्यांनी बनवले. त्यानंतर २००० मध्ये 'मिशन कश्मीर' आणि २००१ मध्ये 'तेरे लिए' या सिनेमांचे एडिटिंग त्यांनी केले. परंतु, सिनेमाचा खरा प्रवास २००३ नंतर सुरू झाला.
त्यांनी स्वतःच्या दिग्दर्शनाखाली बनवलेला पहिला चित्रपट होता 'मुन्नाभाई एमबीबीएस'. संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. राजकुमार हिराणी हे नाव या सिनेमामुळे घराघरात पोहोचले. त्यानंतर २००६मध्ये या चित्रपटाचा पुढील भाग 'लगे रहो मुन्नाभाई' बनवला. त्यालाही उत्तुंग यश मिळाले.
चित्रपट दिग्दर्शनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या हिराणी यांनी २००९मध्ये 'थ्री इडियट्स' बनवला. या चित्रपटाने अक्षरशः इतिहास रचला. हिराणी पुढील चित्रपट कोणता बनवणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले. परंतु, घाईघाईत सिनेमा बनवणाऱ्यांपैकी हिराणी नाहीत. त्यांनी तब्बल पाच वर्षे वेळ घेतला आणि संपूर्ण देशाला वेड लावणारा सुपरहिट 'पीके' बनवला.
हेही वाचा - अक्षय कुमारने यूट्यूबर राशिद सिद्दीकीवर ठोकला ५०० कोटींचा मानहानीचा दावा
दोन वर्षापूर्वी संजय दत्तचा बायोपिक 'संजू' घेऊन राजकुमार हिराणी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आले. अर्थात या चित्रपटालाही अपेक्षित यश मिळाले. आता त्यांच्या पुढच्या सिनेमाची प्रतीक्षा संपूर्ण देश करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार हिराणी सध्या तीन प्रकल्पांवर काम करत आहे. त्यापैकी एक आहे भारतीय फलंदाज लाला अमरनाथचा बायोपिक आहे, दुसरे एक सामाजिक विनोदी चित्रपट आहे आणि तिसरा क्रिकेटवर आधारित काल्पनिक कथा आहे. तथापि, यापैकी कोणत्या कथांवर प्रथम ते काम करतील हे कोणालाही माहिती नाही. त्यांनी याबद्दलची माहिती गुप्त ठेवली आहे. आजवर ११ फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेल्या राजकुमार हिराणींना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या ईटीव्ही भारतच्या शुभेच्छा.
हेही वाचा - विक्की कौशलने केला नव्या चित्रपटाच्या शुटिंगचा 'शुभ आरंभ'